मँचेस्टर : क्रीडाविश्वात अनेकदा एका खेळाडूची दुखापत दुसऱ्यासाठी संधीचे दार उघडते आणि या संधीचे सोने केल्यास खेळाडूचे भवितव्यच बदलून जाते. असाच काहीसा प्रसंग युवा गोलंदाज अंशुल कंबोजच्या बाबतीत घडला आहे. कंबोजने मँचेस्टर कसोटीत भारतीय संघात स्थान मिळवत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
मंगळवारी (दि. 22) वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीतून बाहेर झाला, तर सोमवारी (दि. 21) डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगच्या दुखापतीची बातमी समोर आली. सुरुवातीला अंशुलला आकाश दीपचा राखीव गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु अर्शदीपच्या दुखापतीने अंशुलचे अंतिम अकरा खेळाडूंमधील स्थान जवळपास निश्चित केले.
अंशुलने 2022 मध्ये हरियाणाकडून आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु त्याची खरी चमक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिसली. त्याच सत्रात सय्यद मुश्ताक अली करंडक (राष्ट्रीय टी-20) स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत 7 बळी घेतले. त्यानंतर पुढील हंगामात विजय हजारे करंडक स्पर्धेत 10 सामन्यांत 17 बळी मिळवत हरियाणाच्या विजेतेपदात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला.
सन 2024 मध्ये अंशुलने असा पराक्रम केला, जो रणजी करंडकाच्या सुमारे 91 वर्षांच्या इतिहासात केवळ तीनच गोलंदाजांना करता आला आहे. केरळविरुद्धच्या सामन्यात एकाच डावात सर्व 10 बळी मिळवून अंशुलने आपले नाव इतिहासात नोंदवले. त्याच्या आधी हा पराक्रम प्रेमांग्सू चॅटर्जी (बंगाल, 1956-57) आणि प्रदीप सोमसुंदरम (राजस्थान, 1985-86) यांनी केला होता.
2024-25 चा हंगाम अंशुलसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. त्याची भारत 'क' संघात निवड झाली. येथे त्याने केवळ 3 सामन्यांत 16 बळी मिळवून राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला 'मालिकवीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कामगिरीमुळे त्याला परदेश दौऱ्यासाठी भारत 'अ' संघात स्थान मिळाले.
24 वर्षीय कंबोजच्या या पदार्पणासोबतच मँचेस्टरमध्ये 35 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. वास्तविक, 35 वर्षांनंतर या मैदानावर एखाद्या भारतीय खेळाडूने कसोटी पदार्पण केले आहे. कंबोजपूर्वी, भारताचे माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी 1990 मध्ये याच मैदानावर आपले कसोटी पदार्पण केले होते.
अनिल कुंबळे आणि अंशुल कंबोज यांच्यात आणखी एक विशेष योगायोग आहे. या दोन्ही गोलंदाजांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात 10 बळी घेण्याचा विक्रम आहे. कुंबळे यांनी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत एका डावात सर्व 10 बळी मिळवले होते. त्याचप्रमाणे, अंशुल कंबोजनेही 2024 मध्ये केरळविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात एकाच डावात 10 बळी घेण्याची किमया केली आहे. अनिल कुंबळे यांची गणना भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. या सामन्यात उत्तम कामगिरी करून भारतीय कसोटी संघात आपले स्थान कायम ठेवण्याचा अंशुल कंबोजचा प्रयत्न असेल.
अंशुल कंबोजने आतापर्यंत 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 79 बळी मिळवले आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये २५ सामन्यांत 40 बळी त्याच्या नावावर आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 34 बळी घेतले आहेत. अंशुल कंबोजला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, त्याने भारत 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळले होते, ज्यात त्याने पाच बळी मिळवले होते. आता मँचेस्टर कसोटी सामन्यात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.