KL Rahul Record : मँचेस्टर कसोटीत केएल राहुलचा नवा पराक्रम! इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण
KL Rahul 1000 Test runs in England
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या सामन्यात 11 धावा करताच एका विशेष विक्रमाला गवसणी घातली आहे.
त्याने इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
विविध देशांमधील राहुलची आकडेवारी
राहुलने इंग्लंडपूर्वी केवळ भारतातच 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने मायदेशात 20 कसोटी सामन्यांतील 32 डावांमध्ये 39.62 च्या सरासरीने 1,149 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 1 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये त्याने 25.72 च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेत त्याने 28.38 च्या सरासरीने 369 धावा आपल्या नावावर केल्या आहेत.
वेस्ट इंडिज : राहुलने वेस्ट इंडिजमध्ये 48.14 च्या सरासरीने 336 धावा केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा कोणाच्या नावावर?
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अग्रस्थानी आहे. तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये 17 सामन्यांत 54.31 च्या सरासरीने 1575 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून, त्याने इंग्लंडमध्ये 13 सामन्यांत 68.80 च्या प्रभावी सरासरीने 1376 धावा केल्या आहेत. या यादीत तिसरे स्थान माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचे आहे, ज्यांनी इंग्लंडमध्ये 16 कसोटी सामन्यांमध्ये 1152 धावा केल्या होत्या.
माजी भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये १७ सामन्यांत ३३.२१ च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात 11 धावा पूर्ण करून केएल राहुलनेही आता इंग्लंडमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 1008 धावा केल्या असून, त्याच्या धावसंख्येत आणखी वाढ अपेक्षित आहे. या यादीत विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आता त्याच्याकडे असेल.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर : 1575 धावा
राहुल द्रविड : 1376 धावा
सुनील गावस्कर : 1152 धावा
विराट कोहली : 1096 धावा
केएल राहुल : 1000 धावा पूर्ण (खेळत आहे)
मँचेस्टर कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी
मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने आपल्या अंतिम 11 जणांच्या संघात एक बदल केला असून, दुखापतग्रस्त शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला संधी दिली आहे. दुसरीकडे, भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. संघ व्यवस्थापनाने करुण नायरला वगळून साई सुदर्शनला संधी दिली आहे, तर दुखापतग्रस्त नितीश रेड्डी आणि आकाश दीप यांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
