स्पोर्ट्स

IND vs ENG 3rd Test : बुमराह की सिराज.. ऐतिहासिक ‘लॉर्ड्स’वर कुणाचे वर्चस्व?, भारतीय वेगवान माऱ्याकडे जगाचे लक्ष

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून खेळवला जाणार आहे.

रणजित गायकवाड

ind vs eng 3rd test bumrah siraj bowling comparison Lord s cricket ground

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना येत्या 10 जुलैपासून खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

टीम इंडियाने एजबॅस्टन कसोटी जिंकून ‘तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी’ मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यामुळे उर्वरीत तीन सामन्यासाठी रोमांच निर्माण झाला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे, जिथे मागील दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लंडवर संस्मरणीय विजय मिळवला होता.

दरम्यान, लॉर्ड्स कसोटीत जसप्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्यामुळे, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर बुमराह आणि सिराज या दोघांचा सामना करणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

लॉर्ड्स मैदानावर बुमराह आणि सिराज यांची कामगिरी

बुमराह आणि सिराज या दोघांनाही आजवर लॉर्ड्सच्या मैदानावर प्रत्येकी एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

बुमराहने येथे खेळलेल्या एका सामन्यातील दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना 37.33 च्या सरासरीने एकूण 3 बळी मिळवले आहेत.

दुसरीकडे, सिराजची आकडेवारी अधिक प्रभावी दिसते. सिराजने दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना केवळ 15.75 च्या उत्कृष्ट सरासरीने 8 बळी घेतले आहेत. त्याची या मैदानावरची सर्वोत्तम कामगिरी 32 धावांत 4 बळी अशी आहे.

सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सिराजला गोलंदाजीत विशेष यश मिळाले नव्हते, मात्र एजबॅस्टन कसोटीत त्याने आपल्या लय साधली आणि शानदार पुनरागमन करून एकूण 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आकाश दीपवरही असणार नजरा

बुमराह आणि सिराज यांच्याव्यतिरिक्त, लॉर्ड्स कसोटीमध्ये तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली होती, ज्यात त्याने एकूण 10 बळी मिळवण्याची किमया साधली होती. त्यामुळे लॉर्ड्सवर त्याची गोलंदाजी कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

केवळ 3 विजय

आतापर्यंत भारतीय संघाने लॉर्ड्सवर एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी केवळ तीन सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले आहे, तर 12 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT