स्पोर्ट्स

IND vs ENG Test : ‘लीड्स’ खेळपट्टीचा अहवाल आला समोर, गोलंदाज की फलंदाज कोणाचे राहणार वर्चस्व? क्युरेटरचे महत्त्वाचे विधान

पहिल्या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या संघरचनेसह मैदानात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यामध्ये खेळपट्टीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

रणजित गायकवाड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या प्रारंभाची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथील मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघ हा सामना खेळण्यासाठी हेडिंग्ले येथे दाखल झाले असून, त्यांनी या मैदानावर सरावालाही प्रारंभ केला आहे.

भारतीय संघ 6 जून रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पोहोचला होता, त्यानंतर त्यांनी 10 दिवस लंडनमध्ये वास्तव्य करून कसून सराव केला. आता लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या संघरचनेसह मैदानात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यामध्ये खेळपट्टीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत?

लीड्स मैदानाचा प्रमुख खेळपट्टी क्युरेटर रिचर्ड रॉबिन्सन याने भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ला दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इंग्लंड संघाला केवळ अशी खेळपट्टी हवी आहे जिथे फलंदाज चेंडूच्या रेषेत येऊन आपले फटके खेळू शकतील. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यानंतर, हवामानातील उष्णता लक्षात घेता ही खेळपट्टी सपाट होईल, ज्यावर फलंदाजी करणे अधिक सुलभ होऊ शकते. कसोटी सामन्याच्या सकाळपर्यंत खेळपट्टीवरील गवत कापून ते 8 मिमीपर्यंत ठेवले जाईल, जे हेडिंग्ले येथे कसोटी सामन्यादरम्यान कोणत्याही खेळपट्टीवर साधारणपणे ठेवल्या जाणाऱ्या गवताचे प्रमाण आहे.’

भारताचा डावाने पराभव

भारतीय संघाची लीड्सच्या मैदानावर कसोटीमधील कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. भारतीय संघाने येथे आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी केवळ 2 जिंकले असून 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारतीय संघाने मागील वेळी या मैदानावर 2021 साली कसोटी सामना खेळला होता. ज्यात डावाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT