India vs Australia ODI Virat Kohli Rohit Sharma s craze in Australia
भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. यादरम्यान टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे आणि तितकेच टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याला अजून चार महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक असला तरी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) सामन्यांची तिकीट विक्री सुरू केली आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे, दोन सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामागे टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा, यांची लोकप्रियता हे प्रमुख कारण ठरले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत निवेदनात या दोन सामन्यांची तिकिटे पूर्णपणे विकली गेल्याची माहिती दिली असून, या अभूतपूर्व प्रतिसादाने ते स्वतःही चकित झाले आहेत. इतकेच नव्हे, तर मालिकेतील उर्वरित सामन्यांचीही जवळपास 90 टक्क्यांहून अधिक तिकिटे विकली गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी-20 आणि कसोटी या दोन्ही प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता ते फक्त वनडे सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत. यामुळेच, रोहित आणि कोहलीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्यास अजून बराच अवधी असला तरी, हे दोन्ही स्टार खेळाडू एकदिवसीय मालिकेत खेळतील, अशी तेथील चाहत्यांना खात्री आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विकल्या गेलेल्या एकूण तिकिटांपैकी 16 टक्के तिकिटे भारतीय चाहत्यांच्या गटांनी (Indian Fans Club) खरेदी केली आहेत. यातील काही चाहत्यांनी एकट्याने मोठ्या संख्येने तिकिटे खरेदी करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे होणाऱ्या सामन्यांची सर्व तिकिटे आता पूर्णपणे विकली गेली आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे इव्हेंट्स अँड ऑपरेशन्सचे कार्यकारी महाव्यवस्थापक, जोएल मॉरिसन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, ‘मालिकेला सुरुवात होण्यास चार महिन्यांहून अधिक काळ बाकी आहे, परंतु त्याआधीच सिडनीतील वनदे सामना आणि मानुका ओव्हल येथील टी-20 सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यावरून चाहते या मालिकेची किती आतुरतेने वाट पाहत आहेत, हे स्पष्ट होते.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, ‘भारताविरुद्धच्या मालिकेमुळे आमच्या बोर्डाला मोठा आर्थिक फायदा होतो.’ सीएने कोविड-19 महामारीच्या काळात कॉमनवेल्थ बँकेकडून 300 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे कर्ज घेतले होते. जेव्हा भारताने 2021 मध्ये दौरा केला, तेव्हा त्या मालिकेतून 31.9 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा महसूल मिळाल्याने त्यांना तोटा कमी करण्यास मोठी मदत झाली होती. त्याचप्रमाणे, 2024-25 मधील मालिकेने देखील कांगारू मंडळाला त्यांचा तोटा कमी करण्यास मदत झाली आहे. तर अगामी टीम इंडियाचा दौराही आमच्यासाठी फायदेशीर ठरेल अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे.