India Tour Of Bangladesh pudhari
स्पोर्ट्स

India Tour Of Bangladesh: जुळवून घेणार.. टीम इंडिया बांगलादेशचा दौरा करणार...? BCB चं लेटर BCCI ला पोहचलं

Anirudha Sankpal

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशांमधील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलं ताणावाचं वातावरण आता निवळताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावर देखील हा तणाव निर्माण झाला होता. आता हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीकोणातून बांगलादेश क्रिकेट असोसिएशनने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बांगालदेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयशी संपर्क करून आपापसातील क्रिकेट संबंध मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संवाद पुन्हा रूळावर

बीसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स नझमुल अबेदीन फहीम यांनी एएनआयशी बोलताना दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील संवाद पुन्हा रूळावर आला असून आंतरराष्ट्रीय संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितलं.

फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत नझमुल म्हणतात, 'आम्ही वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट बोर्डाशी सातत्यानं संवाद ठेवत असतो. या संवादाचा भाग म्हणून आम्ही नुकतेच बीसीसीआयला एक ईमेल द्वारे पत्र लिहिले आहे.'

ते पुढे म्हणाले, 'या पत्रात आम्ही भारतीय क्रिकेट संघाचा सप्टेंबरमध्ये मालिका खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा शड्युल आहे. त्यानंतर आमचा महिला क्रिकेट संघ भारत दौरा करणार आहे याचा उल्लेख केला आहे. आम्ही या पत्रात दोन्ही देशांमध्ये अजून काही क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शक्य आहे का याची देखील चाचपणी करण्याची विनंती केली आहे.'

बीसीसीआय आणि बीसीबीमध्ये निर्माण झाली होती दरी

दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी दरी निर्माण झाली होती. आयपीएल २०२६ च्या लिलावानंतर कोलकाता नाईट राडयर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला साईन केलं होतं. मात्र दोन्ही देशांमधील राजकीय वातावरण बिघडल्यानंतर केकेआर आणि बीसीसीआयने मुस्तफिजूरला रिलीज केलं होतं. यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यात वितुष्ट निर्माण झालं.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नंतर भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपव बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. यामुळं यो दोन्ही देशातील क्रिकेट संबंध विकोपाला गेले होते. मात्र बांगलादेशमधील सत्तापरिवर्तनानंतर आता दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील हा वाद मिटत आला असून अनेक प्रगतीची लक्षणे दिसत आहेत.

राजकीय पातळीवर देखील बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर खालिलूर रहमान हे ७ आणि ८ एप्रिल रोजी भारत भेटीवर येणार आहेत. यावरून दोन्ही देशांचे राजकीय संबंध सुधारत असून त्याचा परिणाम क्रिकेट संबंधांवर देखील पडताना दिसत आहे.

भारताचा बांगलादेश दौरा

भारतीय क्रिकेट संघ हा येत्या सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सहा सामने खेळणार आहे. यातील ३ सामने हे वनडे असून ३ टी २० सामन्यांच्या मालिकेचा देखील यात समावेश आहे. हा दौरा आधी ऑगस्ट २०२५ मध्ये शेड्युल होता. मात्र भारतानं बांगलादेशमधील परिस्थिती पाहून सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा पुढे ढकलला होता. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा दौरा पुन्हा आयोजित करण्याची विनंती केली असून दोन्ही क्रिकेट बोर्ड बसून याचे अंतिम वेळापत्रक निश्चित करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT