

IPL Broadcasting Ban: बांगलादेशमधील क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने देशात इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या प्रक्षेपणावर (Telecast) लावलेली बंदी अधिकृतपणे मागे घेतली आहे. नवनिर्वाचित माहिती आणि प्रसारण मंत्री झाहिद उद्दीन स्वपन यांनी शनिवारी या निर्णयाची पुष्टी केली.
तत्पूर्वी युनूस खान यांच्या अंतरिम सरकारनं आयपीएल प्रक्षेपणावर बंदी घातली होती. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध देखील ताणले गेले होते. मात्र आता नव्या सरकारनं नरमाईची भूमिका घेत बांगलादेश क्रिकेटपटूंना मोठा दिलासा दिला आहे.
बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर करताना माहिती मंत्री स्वपन म्हणाले की, नवीन प्रशासन खेळांमध्ये राजकारण आणू इच्छित नाही. ते म्हणाले "आम्हाला खेळाचे राजकारण करायचे नाही. आम्ही याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू. जर कोणत्याही वाहिनीने आयपीएल प्रक्षेपित करण्यासाठी अर्ज केला, तर आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू."
वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशच्या तत्कालीन हंगामी सरकारने आयपीएलच्या प्रक्षेपणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळले होते.
या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता आणि 'लोकांच्या भावना दुखावल्या' गेल्याचे कारण देत प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाचा परिणाम क्रिकेट संबंधांवरही झाला होता.
सरकारने हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता स्टार स्पोर्ट्स (Star Sports) सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वाहिन्या किंवा बांगलादेशमधील स्थानिक वाहिन्या (उदा. T Sports) पुन्हा एकदा आयपीएलचे सामने थेट प्रक्षेपित करू शकतील. यामुळे केवळ क्रिकेट चाहत्यांनाच दिलासा मिळाला नाही, तर दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्याच्या दृष्टीनेही हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.