स्पोर्ट्स

India T20 WC 2026 squad : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिलचा पत्ता कट

इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन; अक्षर पटेल उपकर्णधार, संघात चार फिरकीपटूंचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

T20 World Cup 2026 Team India Squad Announcement

मुंबई : आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा आज (20 डिसेंबर) घोषणा केली. संघनिवडीसाठी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय निवड समितीची बैठक मुंबईत झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्‍यांनी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्‍थित होता.

टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिलचा पत्ता कट

आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ पुढील प्रमाणे : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्‍टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, इशान किशन , रिंकू सिंग, अर्शदीप सिंग.

इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन

टी-२० विश्वचषकासाठी शुभमन गिलला संघात स्‍थान देण्‍यात आलेले नाही. आता ही जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. मागील काही महिने शुभमन गिल हा टी-२० फार्मेटमध्‍ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. दरम्यान, यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि रिंकू सिंग संघात परतले आहेत. इशान शेवटचा भारताकडून २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर इशानची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली, परंतु त्‍याला एकाही सामन्‍यात खेळण्‍याची संधी मिळाली नव्‍हती. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देण्याच्या वादामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते, परंतु आता तो दोन वर्षांनी संघात परतला आहे. रिंकू सिंग आशिया कपमध्‍ये संघात सहभागी होता; परंतु ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संधी मिळाली नव्‍हती. आता इशान किशनबरोबरच रिंकू सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे. दरम्‍यान, टीम इंडियाचा कसोटी आणि वनडेमधील सलामीवीर यशस्‍वी जैस्‍वाल यालाही संघात स्‍थान मिळालेले नाही.

अक्षर पटेल उपकर्णधार

शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलला टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अक्षरने यापूर्वी टी-२० मध्ये उपकर्णधार म्हणून काम पाहिले आहे. विशेष म्हणजे इशान किशन संघात परतला आहे. इशान किशनने अलिकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १०१ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजी उत्तम फॉर्ममध्ये होती. तथापि, इशानच्या समावेशामुळे जितेश शर्माला संघातून वगळण्यात आले आहे.

संजू सॅमसन यष्टीरक्षक

संघाची घोषणा करताना अजित आगरकरने संजू सॅमसन यष्टीरक्षक असेल असे स्‍पष्‍ट केले. गिलला वगळल्याने आता अभिषेक शर्मा त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल हे निश्चित झाले आहे. सॅमसन आणि अभिषेकची सलामी जोडी बरीच यशस्वी झाली आहे . दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-२० मध्येही या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती.

वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी 2026 पासून

टी20 वर्ल्ड कपचे आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली करण्यात येणार आहे. पहिला सामना भारतीय संघाचा विश्वचषक मोहिमेचा श्रीगणेशा ७ फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने होईल. तर अंतिम सामना 20 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

भारताचा पाकशी रंगणार महामुकाबला

गतविजेत्या भारतीय संघाला या स्पर्धेसाठी गट-अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात अमेरिका (यूएसए), नामिबिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तान हे संघही समाविष्ट आहेत.भारताचा पाकिस्तानविरुद्धचा अलीकडील रेकॉर्ड अत्यंत दमदार राहिला आहे. आशिया चषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली होती, त्यामुळे या विश्वचषकातही भारताचे पारडे जड मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT