India vs Pakistan T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: हाय व्होल्टेज भारत-पाक सामन्याआधी टीम इंडिया अडचणीत; ही आहेत 4 मोठी कारणे

High-Voltage Ind-Pak Match: टी20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याआधी टीम इंडियाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अभिषेक शर्माच्या फिटनेसची समस्या, रिंकू सिंहचा खराब फॉर्म या मोठ्या चिंता आहेत.

Rahul Shelke

India vs Pakistan T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणारा भारत आणि पाकिस्तान महामुकाबला सध्या चर्चेत आहे. राजकीय वाद, बहिष्काराच्या धमक्या आणि सोशल मीडियावरील गदारोळ यामुळे हा सामना आधीपासूनच ‘हाय-वोल्टेज’ बनला होता. आता सामना होणार असला, तरी प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याआधीच टीम इंडियासमोर काही गंभीर समस्या आहेत. नामीबियाविरुद्ध विजय मिळवला असला, तरी भारताची टीम अजून पूर्णपणे सेट झालेली दिसत नाही. उलट, पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी संघात चार समस्या दिसून येत आहेत.

अभिषेक शर्माचा फिटनेस

सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माचा फिटनेस. स्टमक इन्फेक्शनमुळे त्याला पहिल्या सामन्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळे त्याने नामीबियाविरुद्धचा सामना गमावला. कर्णधार सूर्यकुमार यादवने संकेत दिले आहेत की अभिषेकच्या पुनरागमनासाठी अजून एक-दोन सामने वाट पाहायला लागू शकते. पाकिस्तानविरुद्ध तो खेळला नाही, तर भारताच्या टॉप ऑर्डरवर मोठा ताण येणार आहे.

रिंकू सिंगचा खराब फॉर्म

दुसरी चिंता म्हणजे मिडल ऑर्डरचा फिनिशर रिंकू सिंगचा खराब फॉर्म. पहिल्या सामन्यात त्याने 14 चेंडूत केवळ 6 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत फक्त 1 धाव. सामान्याच्या शेवटच्या षटकांत सामना फिरवणारा रिंकू सध्या पूर्णपणे आउट ऑफ टच दिसतोय. पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध हा फॉर्म भारताला महागात पडू शकतो.

भारतीय फलंदाजांची अडचण

तिसरा मुद्दा म्हणजे स्पिनसमोर भारतीय फलंदाजांची अडचण. नामीबियाविरुद्ध 209 धावा उभारल्या असल्या, तरी मधल्या षटकांत स्पिनर्सने भारताला अक्षरशः घाम फोडला. विकेट्स गेल्या आणि रनरेटही कमी झाला. कोलंबोची खेळपट्टी पारंपरिकपणे स्पिनला मदत करणारी मानली जाते आणि पाकिस्तानकडेही दर्जेदार फिरकीपटू आहेत.

पॉवरप्लेमधील गोलंदाजी

चौथी आणि तितकीच महत्त्वाची समस्या म्हणजे पॉवरप्लेमधील गोलंदाजी. नामीबियाने पहिल्या सहा षटकांत 57 धावा करत भारताच्या वेगवान गोलंदाजांना सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. पाकिस्तानचे ओपनर्स आक्रमक सुरुवात करण्यासाठी ओळखले जातात. पॉवरप्लेमध्ये नियंत्रण मिळवलं नाही, तर भारताला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागू शकतो.

एकीकडे भारत-पाकिस्तान सामना म्हणजे भावनांचा महापूर, प्रेक्षकांची गर्दी आणि टीआरपीचा स्फोट. पण दुसरीकडे, टीम इंडियासाठी हा सामना केवळ प्रतिष्ठेचा नाही, तर संघातील उणिवा तपासणारी मोठी कसोटीही आहे. फिटनेस, फॉर्म, स्पिनविरुद्धची तयारी आणि सुरुवातीची गोलंदाजी, या चारही आघाड्यांवर सुधारणा झाली, तरच भारत या महामुकाबल्यात वरचढ ठरू शकतो. नाहीतर कोलंबोच्या मैदानावर पाकिस्तान भारताला कठीण आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT