भारत-इंग्लंड पाचवी व निर्णायक कसोटी
पहिल्या दिवशी केवळ 64 षटकांचा खेळ
सलामीवीरांसह शुभमनकडूनही निराशा
इंग्लंडतर्फे गस अॅटकिन्सन, जोश टंगचे प्रत्येकी 2 बळी
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ‘ओव्हल’च्या हिरव्यागार खेळपट्टीवर भारताला 6 बाद 204 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि के. एल. राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल देखील धावबाद झाला होता. मात्र, नंतर अर्धशतकवीर करूण नायर (52) व वॉशिंग्टन सुंदर (19) यांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 51 धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दिवसाच्या प्रारंभी ढगाळ वातावरण आणि गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची कसोटी लागली. या मैदानावरील आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे नाणेफेक जिंकणार्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची मालिका या कसोटीतही कायम राहिली. मालिकेत पहिलाच सामना खेळणार्या वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनने यशस्वी जैस्वालला (2) पायचीत पकडून भारताला पहिला धक्का दिला. मैदानावरील पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर इंग्लंडने घेतलेले ‘डीआरएस’ यशस्वी ठरले.
त्यानंतर, बहरात दिसणारा के. एल. राहुल (14) ख्रिस वोक्सच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू स्टम्पवर ओढून बसला आणि भारताची अवस्था 2 बाद 36 झाली होती. या कठीण परिस्थितीत कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांनी संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला होता. सुदर्शनने काही सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह मारले, तर गिलने कव्हरमधून आकर्षक पंच आणि शॉर्ट आर्म पुलचा वापर करत धावा जमवल्या. इंग्लंडतर्फे ख्रिस वोक्सने 14 षटकांत 46 धावांमध्ये 1 बळी घेतला. तर गस अॅटकिन्सनने 19 षटकांत 31 धावांत दुहेरी यश मिळविले. त्याला जोश टंगने 47 धावांत 2 बळींसह समयोचित साथ दिली.
भारतीय संघाने आपल्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघात चार महत्त्वाचे बदल केले. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेल्या वेगवान गोलंदाज आकाश दीपसह, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव ज्युरेल यांना संघात संधी देण्यात आली. बुमराह, अंशुल कंबोज, शार्दूल ठाकूर आणि दुखापतग्रस्त पंत संघाबाहेर राहिले.
ऑफ स्टम्पवरील चेंडू हलक्या हाताने खेळून शुभमन गिल धाव घेण्यासाठी पुढे सरसावला; पण त्याची ही मोठी चूक ठरली. गोलंदाज गस अॅटकिन्सनने आपल्या फॉलो-थ्रूमध्ये कमालीची चपळाई दाखवत चेंडू उचलला आणि थेट स्टम्पवर अचूक निशाणा साधला. गिल खेळपट्टीच्या मधोमध पोहोचला होता आणि परत फिरण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो घसरला. खरे तर, तिथे धाव घेण्याची कोणतीही संधी नव्हती; पण गिलच्या या अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.