स्पोर्ट्स

Asia Cup Rising Star : भारतीय गोलंदाजांनी नेपाळचा २६ धावांत डाव संपवला! टीम इंडियाचा ३०६ धावांनी दणदणीत विजय

India vs Nepal Cricket : तिलक वर्मा-कुमार कुशाग्रची धमाकेदार शतके; भारताने रचला ३३२ धावांचा डोंगर

रणजित गायकवाड

दोहा : रायझिंग स्टार्स आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारत 'अ' संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात ऐतिहासिक विजयाने केली आहे. दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच साखळी सामन्यात भारताने नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी पराभव केला. तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शतकी खेळींनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या २६ धावांत गारद झाला. धावांच्या फरकाने हा भारत 'अ' संघाचा लिस्ट 'अ' क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. दुसरीकडे, नेपाळची २६ धावांची धावसंख्या लिस्ट 'अ' क्रिकेट इतिहासातील पाचव्या नीचांकी धावसंख्येची नोंद ठरली.

तिलक वर्मा-कुमार कुशाग्रची शतके; भारताची ३३२ धावांची मजल

या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, भारतीय सलामीवीरांना मोठी भागीदारी करता आली नाही. अभिषेक सहाव्या षटकात माघारी परतला, तर आयुष बडोनीला अवघ्या दोन धावा करता आल्या. वैभव सूर्यवंशीने ३२ चेंडूंत २६ धावांचे योगदान दिले.

सुरुवातीच्या धक्क्यांमुळे भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी डावाची जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०६ धावांची शानदार भागीदारी करत भारतीय संघाला भक्कम स्थितीत आणले. कुशाग्रने आक्रमक फलंदाजी करत १०२ चेंडूंत १० चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. तर तिलक वर्माने ११३ चेंडूंचा सामना करत सहा चौकार आणि चार षटकारांसह १०७ धावांची शतकी खेळी साकारली.

अखेरच्या षटकांमध्ये सूर्यांश शेडगेनेही आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. त्याने अवघ्या १४ चेंडूंत चार षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३६ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३३२ धावांचा मोठा डोंगर उभारता आला. नेपाळकडून ललित राजबंशी आणि कर्णधार संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी तीन, तर नंदन यादवने दोन बळी घेतले.

भारतीय गोलंदाजांचा कहर; नेपाळचा डाव अवघ्या २६ धावांत संपुष्टात

भारताने दिलेल्या ३३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली. भारतीय वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीपासूनच नेपाळच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यांच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीसमोर नेपाळच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

प्रिन्स यादवने अवघ्या पाच षटकांत सहा धावा देत पाच बळी मिळवले. त्याला हर्षित राणाने उत्तम साथ दिली. हर्षितने सहा षटकांत १६ धावा देत चार फलंदाजांना बाद केले. शाहबाज अहमदने उर्वरित एक बळी घेत नेपाळचा डाव गुंडाळण्यात योगदान दिले.

नेपाळच्या फलंदाजीची अवस्था इतकी बिकट होती की, संघातील पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पवन सर्राफ आणि रशीद खान यांनी प्रत्येकी सहा धावा केल्या. या दोघांचीच धावसंख्या नेपाळच्या डावातील सर्वोच्च ठरली. अखेर संपूर्ण संघ ११.३ षटकांत अवघ्या २६ धावांवर बाद झाला. भारताच्या या ऐतिहासिक विजयात शतक झळकावणाऱ्या कुमार कुशाग्रला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गुणतालिकेत भारत अव्वल; २२ नोव्हेंबरला पाकिस्तानशी सामना

नेपाळविरुद्धच्या या विक्रमी विजयामुळे भारत 'अ' संघाने रायझिंग स्टार्स आशिया चषकाच्या 'ब' गटातील गुणतालिकेत दोन गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. मोठ्या विजयामुळे भारताची निव्वळ धावगतीही सुधारली असून, संघाने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

आता भारतीय संघाचे लक्ष आगामी सामन्याकडे लागले आहे. २२ नोव्हेंबर रोजी भारत 'अ' संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. नेपाळविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असून, पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT