लंडन : विजयासाठी चौथ्या डावात अवघ्या 193 धावांचे आव्हान; पण तरीही अवघ्या 58 धावांत 4 गडी गमवावे लागत असतील, तर तंबूत खळबळ उडाल्याशिवाय राहत नाही. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्यात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. वॉशिंग्टन सुंदरचे 4 बळी, बुमराह-सिराजचे प्रत्येकी 2 बळी यामुळे भारताने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 192 धावांमध्ये गुंडाळला खरा; पण विजयासाठी 193 धावांचे तुलनेने माफक भासणारे आव्हान आता 4 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डोंगराएवढे मोठाले दिसू लागले आहे.
या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने यशस्वी जैस्वालसारखा मोहरा शून्यावर गमावला. स्वत:चे नाणे खणखणीत वाजवण्याची नामी संधी असतानाही करुण नायरसारखा अनुभवी चेहरा 14 धावांवर परतताना पाहिला आणि इतके कमी की काय म्हणून लीडस् व बर्मिंगहममध्ये धावांची अक्षरश: रास ओतणारा शुभमन गिल अगदी अवघ्या 6 धावांवर बाद होताना पाहिला. नाईट वॉचमन म्हणून उतरणारा आकाश दीपही आल्या पावली परतला, त्यावेळी हा भारतासाठी चौथा धक्का ठरला. अर्थात, आज सामन्याच्या पाचव्या दिवशी 90 षटकांचा पूर्ण खेळ हाताशी असताना भारताला आणखी 135 धावांची आवश्यकता असून, अर्थातच सारी मदार आहे ती महत्त्वाकांक्षी के. एल. राहुलवर.
उभय संघातील 5 सामन्यांची ही मालिका तूर्तास 1-1 फरकाने बरोबरीत असून, आज विजय संपादन करून मालिकेत आघाडी घेण्याचा ज्याप्रमाणे भारताचा प्रयत्न असेल, त्याप्रमाणे इंग्लंडचाही प्रयत्न असेल. कळीचा प्रश्न मात्र एकच बाकी राहतो, तो म्हणजे इंग्लंडचा संघ 6 फलंदाज गारद करत विजयावर शिक्कामोर्तब करणार की, भारत उर्वरित 135 धावांची आतषबाजी करत विजय इंग्लंडच्या जबड्यातून खेचून आणणार?
या सामन्यात इंग्लंडचा संघ एकवेळ 4 बाद 154 अशा स्थितीत होता आणि जो रूटसारखा कसलेला फलंदाज आणखी एक मोठी खेळी साकारण्याच्या इराद्याने एकेक महत्त्वाकांक्षी पाऊल पुढे टाकत होता. मात्र, याचवेळी वॉशिंग्टन सुंदरच्या एका अप्रतिम चेंडूवर पॅडल स्वीपचा प्रयत्न सपशेल फसला आणि त्रिफळा कधी उडाला, हे त्यालाही कळाले नाही. त्यानंतर सुंदरने स्टोक्सला 33 धावांवर त्रिफळाचीत केले, तर जेमी स्मिथचा बळी घेत इंग्लिश फ लंदाजीला आणखी एक मोठे भगदाड पाडले. अगदी शेवटचा फलंदाज शोएब बशीरलादेखील सुंदरनेच बाद करत डावातील आपला चौथा बळी नोंदवला. येथेच इंग्लंडचा डाव सर्वबाद 192 धावांवर संपुष्टात आला.
डावाच्या प्रारंभी काटेकोर मारा करणार्या मात्र, एकही यश न लाभलेल्या बुमराहला डावाच्या उत्तरार्धात मात्र उत्तम सूर सापडला. त्याने एका अप्रतिम यॉर्करवर कार्सचा त्रिफळा उडवला, तर नंतर वोक्सलासुद्धा तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने या डावात 38 धावांत 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले.
3 : वॉशिंग्टन सुंदरने रूट, स्मिथ व स्टोक्स असे तीन बिनीचे मोहरे, तर अवघ्या 8.3 षटकांत 18 धावांमध्येच गारद केले होते. नंतर त्याने डावात 4 बळी नोंदवले.
4 : जो रूट मायभूमीतील कसोटीत सर्वाधिक धावा जमवणारा चौथा फलंदाज ठरला. येथे त्याने कॅलिसचा आफ्रिकन भूमीतील 7,035 धावांचा विक्रम मागे टाकला. रूटने इंग्लिश भूमीत आतापर्यंत 7,045 धावा जमवल्या आहेत.
10 : भारताने या कसोटीत इंग्लंडच्या 20 पैकी 10 फलंदाजांना त्रिफळाचीत बाद करण्याचा विक्रम नोंदवला. गतवर्षी हैदराबाद कसोटीतही भारताने इंग्लंडविरुद्ध 10 फलंदाज त्रिफळाचीत केले होते.
38 : इंग्लंडने आपल्या दुसर्या डावात शेवटचे 6 बळी अवघ्या 38 धावांत गमावले, हेदेखील त्यांच्या पडझडीचे मुख्य कारण ठरले.
603 : शुभमन गिल या सामन्यातील दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाला असला, तरी त्याची या मालिकेतील धावसंख्या आता 603 वर पोहोचली आहे.