

पुढारी ऑनलाईन : लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला. त्याने इंग्लंडविरुद्ध ५ बळी मिळवले आणि यासह परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा तो अव्वल भारतीय गोलंदाज ठरला आहे.
बुमराहने परदेशात १३व्यांदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. या कामगिरीमुळे महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी परदेशी दौऱ्यांवर १२ वेळा पाच बळी मिळवले होते. तर अनिल कुंबळे (९ वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह - १३ वेळा
कपिल देव - १२ वेळा
अनिल कुंबळे - १० वेळा
इशांत शर्मा - ९ वेळा
४७ कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने १९.४९ च्या उत्कृष्ट सरासरीने २१५ बळी घेतले आहेत. यामध्ये २७ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असून, त्याने १५ वेळा डावात पाच बळी मिळवले आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून, २०६ सामन्यांमध्ये बुमराहने ४५० हून अधिक बळींचा टप्पा ओलांडला आहे. त्याने २०.४८ च्या सरासरीने ४५३ बळी घेतले आहेत, ज्यात १९ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि त्याने १७ वेळा डावात पाच बळी मिळवले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहने २३ षटकांत ७४ धावा दिल्या आणि पाच बळी घेतले. बुमराहने हॅरी ब्रूक, जो रूट, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले. त्याने ख्रिस वोक्सलाही विकेटमागे झेलबाद केले. बुमराहच्या धारदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला.