वेस्टइंडीजविरुद्ध दिल्लीत १० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कोणत्याही दबावाशिवाय मैदानात उतरेल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने अहमदाबादमधील पहिल्या कसोटीत समाधानकारक विजय नोंदवला. ज्या खेळाडूंना संधी मिळाली, त्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र, साई सुदर्शन या संधीचा फायदा उठवू शकले नाहीत.
वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत या २१ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजावर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे दडपण असेल. जर साई सुदर्शन चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या मालिकेतून त्यांची गच्छंती होऊ शकते. भारताकडे नंबर ३ साठी किमान ५ फलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांना आजमावले जाऊ शकते.
भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या दीर्घकाळापासून कायम आहे. चेतेश्वर पुजारा याच्यानंतर या स्थानावर शुभमन गिलला संधी देण्यात आली. पण त्याला या क्रमांकावर फारशी विशेष कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत धमाकेदार प्रदर्शन केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर साई सुदर्शन आणि करुण नायर यांना या क्रमांकावर आजमावले गेले. या दोघांचेही प्रदर्शन फारसे चांगले नव्हते, तर उर्वरित भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
करुण नायर अपेक्षेनुसार प्रदर्शन करू शकला नाही. त्याला तिसऱ्या क्रमांकावर ४ डावांमध्ये संधी मिळाली, ज्यात त्याने १११ धावा केल्या. इंग्लंडमध्ये त्याने एकूण ८ डावांमध्ये २०५ धावा केल्या. यामुळे वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नायरला संघातून वगळण्यात आले.
मुख्य निवडकर्ते अजित अगरकर यांनी सांगितले की, करुण नायरकडून आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. साई सुदर्शनने आतापर्यंत केवळ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. ७ सामन्यांमध्ये त्याने २१ च्या सरासरीने १४७ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
जर वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही साई सुदर्शन यशस्वी होऊ शकला नाही, तर अगरकर हे पुढील पत्रकार परिषदेत करुण नायर याच्यासाठी वापरलेले शब्द साईसाठीही वापरतील. कारण भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडू रांगेत आहेत. साई सुदर्शनला संधी देण्यासाठी निवड समितीने करुण नायरकडे दुर्लक्ष केले, पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४८.५० च्या प्रभावी सरासरीने धावा काढणाऱ्या अभिमन्यू ईश्वरन याला कधीपर्यंत दुर्लक्षित केले जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ईश्वरन व्यतिरिक्त, रजत पाटीदार मधल्या फळीत सातत्याने धावा करत आहे. तसेच ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल आणि वॉशिंग्टन सुंदर हे इतर तीन पर्याय उपलब्ध आहेत. इंग्लंड मालिकेपूर्वी वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याबाबत चर्चा झाली होती. वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जुरेल आणि सुंदर यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली होती. पडिक्कल याचाही १५ जणांच्या संघात समावेश आहे.
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत जुरेलने वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पंतचे पुनरागमन झाल्यास जुरेलला फलंदाज म्हणून खेळवण्यावर वादविवाद होण्याची शक्यता आहे. शतक झळकावलेल्या खेळाडूला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणे सोपे नसते. निवडकर्ते साई सुदर्शन याच्यावर विश्वास दाखवत आहेत, कारण त्यांना वाटते की चेन्नईचा हा खेळाडूचा वेगवेगळ्या परिस्थितीत कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी योग्य आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इंग्लंड मालिकेच्या समाप्तीनंतर जेव्हा दोन्ही संघांनी एकत्र वेळ घालवला, तेव्हा जुरेलला मदत केलेल्या जो रूटने साई सुदर्शनशी संवाद साधला आणि त्याला त्याचा खेळ सध्या आहे तितकाच सोपा ठेवण्याचा सल्ला दिला. इंग्लंडचे अन्य दोन माजी कर्णधार माइक अथरटन आणि नासिर हुसेन यांनीही त्याला तोच सल्ला दिला.
लेग-साईडवर बाद होण्यावरून साई याच्यावर बरीच टीका झाली. त्यामुळे इंग्लंडहून परतल्यावर साईने चेन्नईतील त्याच्या प्रशिक्षकांसोबत या कमकुवत बाजूवर काम केले. अहमदाबाद कसोटीत लेग-साईडला खेळताना त्याच्यात आत्मविश्वास दिसला, पण फिरकी गोलंदाजांसमोर त्याला अडचणी आल्या. तो मागे हटून खेळताना दिला. ही त्याची चूक असल्याचे तज्ञांचे मत आहे.
असे नाही की वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी साईने चांगली कामगिरी केली नाही. साऊथ झोनच्या निवडकर्त्यांनी त्यला दिलीप ट्रॉफीसाठी संघात समाविष्ट केले नव्हते. त्यानंतर त्याने 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये काही आठवडे घालवले आणि मग इंडिया-ए साठी दोन सामन्यांमध्ये सहभाग घेतला. त्याने 'ऑस्ट्रेलिया-ए' विरुद्ध अनुक्रमे ७३, ७५ आणि १०० धावा केल्या. त्यावेळी के.एल. राहुलने फलंदाजीसाठी परिस्थिती अत्यंत कठीण असल्याचे नमूद केले होते.
'ऑस्ट्रेलिया-ए' विरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर अहमदाबाद कसोटीत साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्याच्या बॅटमधून धाव निघाल्या असत्या तर किमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तरी त्याची निवड निश्चित झाली असती. आता दिल्ली कसोटीत त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल. या डावखुऱ्या फलंदाजाला अजूनही संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा असल्याचे मानले जात आहे, पण १० दिवसांत रणजी ट्रॉफी सुरू होत आहे. त्यामुळे अन्य दावेदारांनी चांगली कामगिरी केल्यास साईवरचा दबाव आणखी वाढेल.