

आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी शुभमन गिलची भारतीय वन डे संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि याचवेळी हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वपर्वाची सांगता झाली. रोहित शर्मा यापुढेही वन डे संघात समाविष्ट असेल. पण, तो फक्त खेळाडू म्हणून. या पार्श्वभूमीवर, रोहितच्या वन डे नेतृत्व कारकिर्दीची ही संक्षिप्त झलक...
2017 मध्ये पहिल्यांदा वन डे संघाचे नेतृत्व केल्यापासून रोहितने 56 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यात त्याने संघाला 42 विजय मिळवून दिले.
एकूण सामने : 56
विजय : 42
पराभव : 12
अनिर्णीत : 1
टाय (बरोबरी) : 1
विजयाची टक्केवारी : 75 टक्के
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 आणि 2023 मध्ये आशिया चषक जिंकला. याशिवाय, 2023 विश्वचषकात उपविजेतेपद आणि यावर्षी दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद पटकावले.
विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर, 2022 च्या सुरुवातीला रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळेपासून ‘हिटमॅन’ची खरी जादू सुरू झाली. फेब्रुवारी 2022 पासून रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने 46 पैकी 34 सामने जिंकले आणि केवळ 10 गमावले.
फलंदाजीतील योगदान : या काळात रोहितने 45 सामन्यांमध्ये 47.87 च्या सरासरीने आणि 116.84 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 1963 धावा केल्या. यात 3 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात किमान 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या कोणत्याही खेळाडूचा स्ट्राईक रेट रोहितपेक्षा जास्त नव्हता. पाकिस्तानचा बाबर आझम (86.93) आणि वेस्ट इंडिजचा शाई होप (95.55) स्ट्राईक रेटमध्ये त्याच्यापेक्षा खूप मागे होते.
रोहित आपल्या 40 धावांचे अर्धशतकात किंवा 60-70 धावांचे शतकात रूपांतर करू शकला नाही; परंतु त्याने पॉवरप्लेमध्ये भारताला ती आक्रमक सुरुवात करून दिली आणि नेमकी याचीच संघाला अनेक वर्षांपासून उणीव भासत होती. त्याच्या फ्लाईंग स्टार्टसमुळे विराट कोहलीवरील दडपण कमी झाले. शिवाय, मधल्या षटकांमध्ये के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यरसारख्या फलंदाजांना आक्रमणावर सर्वस्वी भर देणे शक्य झाले.
पूर्णवेळ कर्णधार म्हणून खेळलेल्या तीनही मोठ्या स्पर्धांमध्ये रोहित भारताचा सर्वात प्रभावी फलंदाज ठरला. यादरम्यान, 21 डावांमध्ये 48.55 च्या सरासरीने आणि 116.42 च्या स्ट्राईक रेटने 971 धावा केल्या. यात एक शतक आणि सात अर्धशतके होती.
2023 विश्वचषक : या स्पर्धेत तो 597 धावांसह दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचा स्ट्राईक रेट 125.94 इतका होता. एकाच विश्वचषक स्पर्धेत 10 पेक्षा जास्त सामने खेळणार्या सलामीवीराची ही सर्वोत्तम कामगिरी होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल : यावर्षी दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना त्याने 83 चेंडूंत 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला.