

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करण्याची मोठी संधी आहे. तो ४००० कसोटी धावा आणि ३०० कसोटी बळी घेणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विंडिजविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता.
जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या रवींद्र जडेजाला कसोटीत ४००० धावांचा आकडा गाठण्यासाठी केवळ १० धावांची आवश्यकता आहे. दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो हा विक्रम आरामात रचू शकतो. सध्या ५००० धावा आणि ४०० बळी याहून मोठ्या विक्रमाच्या 'क्लब'मध्ये केवळ कपिल देव यांचा समावेश आहे. जडेजादेखील भविष्यात त्या विक्रमापर्यंत पोहोचू शकतो. सध्या जडेजाच्या नावावर ३९९० धावा आणि ३३४ बळी जमा आहेत.
पहिल्या कसोटीनंतर या विक्रमाबद्दल विचारले असता, स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने हसून मिश्किल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘आता तुम्ही माझ्यावर दबाव आणत आहात. मला आणखी १००० धावा आणि ६०-७० बळी कसे घ्यायचे याचा विचार करावा लागेल.”
तो पुढे म्हणाला, “सध्या मी कसोटी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहे. मी विक्रम किंवा माईलस्टोन यांचा विचार करत नाही. मी फक्त माझ्या फिटनेस आणि अधिक चांगले खेळण्याचा आनंद घेत आहे. जेव्हाही मी घरी असतो, तेव्हा नेहमी माझ्या तंदुरुस्तीवर काम करतो, जेणेकरून मी गेली अनेक वर्षे जे करत आलो आहे ते सातत्याने करत राहीन.”
३६ वर्षीय रवींद्र जडेजा आजही मैदानात अत्यंत सक्रिय आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने भारताच्या पहिल्या डावात नाबाद १०४ धावा केल्या. तरा विंडिजच्या दुसऱ्या डावात चार बळी घेतले. अहमदाबाद कसोटीतील हे शतक जडेजाच्या या वर्षातील फलंदाजीतील उत्कृष्ट फॉर्म अधिक वाढवणारे ठरले आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत सात कसोटी सामन्यांत ८२.३७ च्या सरासरीने ६५९ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यापैकी ५१६ धावा इंग्लंडमध्ये आल्या, जिथे त्याने आठ डावांमध्ये सहा वेळा ५० हून अधिक धावांची खेळी केली.