India vs Sri Lanka Eleven warm up match  
स्पोर्ट्स

IND Vs SL XI : सिराजचे षटकार अन् भारताचा रोमहर्षक विजय! सराव सामन्यात श्रीलंका इलेव्हनवर ४ गडी राखून मात

विजयासाठी मिळालेले २०७ धावांचे आव्हान भारताने केले सहज पार

पुढारी वृत्तसेवा

India vs Sri Lanka Eleven warm up match : श्रीलंका दौऱ्यावरील एकमेव तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनचा ४ गडी राखून धुव्वा उडवला. कोलंबोतील नॉंडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात विजयासाठी मिळालेले २०७ धावांचे आव्हान भारताने ४४.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. मोहम्मद सिराजच्या फटकेबाजीमुळे भारताचा हा विजय अधिकच रोमहर्षक ठरला.

सिराजची ३२ धावांची दमदार खेळी

सामन्याच्या अंतिम टप्प्यात भारत सहज विजयाकडे वाटचाल करत असताना सिराजने १५ चेंडूंत १ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावांची दमदार खेळी केली. केशरा नुवांथाच्या षटकात सलग तीन षटकार ठोकत त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सामना जिंकल्यानंतरही नियमानुसार भारतीय फलंदाजांनी उर्वरित तीन चेंडू खेळले. सारांश जैन २ धावांवर नाबाद राहिला. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होत आहे.

पहिल्या डावात पडिक्कलची चमकदार कामगिरी

सराव सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंका इलेव्हनच्या ३६३/८ च्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवशी ६ बाद ३५७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंका इलेव्हनने दुसरा डाव ४५ षटकांत ६ बाद २०० धावांवर घोषित करत भारताला २०७ धावांचे आव्हान दिले.दुसऱ्या डावात भारताकडून कर्णधार शुभमन गिलने ५४ चेंडूंत ७ चौकारांसह ४४ धावा केल्‍या. जोडल्या. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला यशस्वी जायसवाल दुसऱ्या डावात चांगल्या लयीत दिसला. त्याने ४६ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली व तो रिटायर्ड हर्ट झाला. गिल आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भक्कम भागीदारी रचली.

पंत आणि जुरेलची भागीदारी

ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भर घातली. जुरेल १७ धावा करून बाद झाला, तर पंतने ६८ चेंडूंत २८ धावा (१ चौकार, ३ षटकार) केल्या. रवींद्र जडेजाने ३२ चेंडूंत २२ धावा करत रिटायर्ड हर्ट होणे पसंत केले. गुरनूर बराड (२) स्वस्तात बाद झाला, तर मानव सुथार (४) रिटायर्ड हर्ट झाला.

निशान मदुष्काचे अर्धशतक

त्यापूर्वी, दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने श्रीलंकेला पहिला धक्का देत रविंदू रसंथाला (८) पायचित केले. प्रसिद्ध कृष्णाने पसिनंदू सोरियाबंदराला (४) त्रिफळाचित केले, तर गुरनूर बराडने पवन रत्नायकेला (१९) बाद केले. पवनने निशान मदुष्कासोबत ५१ धावांची भागीदारी केली होती. मदुष्का ६३ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. अंजला बंदाराची (३५) झुंज जडेजाने संपवली. निपुण धनंजयने ४६ धावांचे योगदान दिले.

पहिल्‍या डावात स्‍टार फलंदाज अपयशी

पहिल्या डावात भारताकडून देवदत्त पडिक्कलने अप्रतिम फलंदाजी करत आगामी कसोटी मालिकेतील प्लेइंग इलेव्हनमधील आपला दावा मजबूत केला. त्याने १६४ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने नाबाद १४२ धावांची दणदणीत खेळी केली. पडिक्कल द्विशतक करेल असे वाटत असतानाच भारताने डाव घोषित केला. गुरनूर बराडने नाबाद ३६ धावा केल्या.पडिक्कलची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि फिरकीपटूंविरुद्धचे त्याचे फुटवर्क उल्लेखनीय होते. त्याने ऑफस्पिनर रमेश मेंडिसच्या चेंडूवर पुल मारत १२१ चेंडूंत शतक पूर्ण केले. दरम्यान, पहिल्या डावात यशस्वी जायसवालला खातेही उघडता आले नाही, तर केएल राहुल (४०) अर्धशतक हुकला. ऋषभ पंत (२) आणि ध्रुव जुरेल (१) पहिल्या डावात फलंदाजीत अपयशी ठरले. मात्र, अनुभवी रवींद्र जडेजाने ६३ धावांची संयमी खेळी केली आणि मानव सुथारने ४१ धावा करत संघाला सावरले.

धावफलक

  • श्रीलंका इलेव्हन (पहिला डाव): ३६३/८ घोषित

  • भारत (पहिला डाव): ३५८/६ घोषित

  • श्रीलंका इलेव्हन (दुसरा डाव): २००/६ घोषित

  • भारत (दुसरा डाव): २१४/४ (४५ षटके)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT