स्पोर्ट्स

Yashasvi Jaiswal ICC Fine : वाद, शिवीगाळ अन् थेट टक्कर! मैदानातील राडा यशस्वी जैस्वालला भोवला, ICC चा तगडा झटका

मैदानावर डोकी भिडली अन् ICC चा थेट ‘हंटर’ फिरला, फर्नांडोलाही दंड

रणजित गायकवाड

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानावर झालेल्या वादावादीप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर भूमिका घेतली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिता फर्नांडो यांच्यावर आयसीसीने सामन्याच्या मानधनाच्या (मॅच फी) २५ टक्के दंडात्मक कारवाई केली असून, दोघांच्याही खात्यात प्रत्येकी एक डिमेरिट पॉईंट नोंदवला आहे. मात्र, या दोघांवरही बंदीची कारवाई टळल्याने दोन्ही संघांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जोरदार शाब्दिक चकमक

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय डावाच्या १७ व्या षटकात ही घटना घडली. असिता फर्नांडोने ५३ चेंडूंत ४५ धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालला बाद केले. त्यानंतर फर्नांडोने आक्रमक पद्धतीने जैस्वालला 'सेंड ऑफ' देण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल जैस्वाल त्याच्या दिशेने गेला आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादादरम्यान फर्नांडोने आपले डोके जैस्वालच्या दिशेने पुढे केले, तर जैस्वालही समोर झुकल्यामुळे दोघांच्या डोक्यांची हलकी टक्कर झाली. अखेर पंचांनी तत्परतेने हस्तक्षेप करत दोन्ही खेळाडूंना एकमेकांपासून वेगळे केले.

उल्लंघनासाठी दोषी आढळले

आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही खेळाडू आचारसंहितेच्या 'लेव्हल १' अंतर्गत असलेल्या नियम २.१२ च्या उल्लंघनासाठी दोषी आढळले आहेत. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी किंवा प्रेक्षकांसोबत अनुचित शारीरिक संपर्क करण्याशी संबंधित आहे.

शिक्षा दोन्ही खेळाडूंना मान्य

सामन्याचे पंच अहसान रझा, शरफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच रॉड टकर आणि चौथे पंच प्रगीथ रामबुकवेला यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी प्रस्तावित केलेली शिक्षा दोन्ही खेळाडूंनी विनाअट मान्य केली. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही. गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीत या दोन्ही खेळाडूंचा असा कोणताही गैरवर्तनाचा इतिहास नसल्यामुळे त्यांना अधिक कठोर शिक्षेला सामोरे जावे लागले नाही.

काय आहे नियम

नियम १ अंतर्गत दोषी आढळल्यास किमान अधिकृत ताकीद दिली जाते, तर कमाल ५० टक्के मॅच फीचा दंड आणि १ ते २ डिमेरिट पॉईंट्स दिले जातात. नियमानुसार, २४ महिन्यांच्या कालावधीत खेळाडूच्या खात्यात ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट पॉईंट्स जमा झाल्यास त्याचे निलंबन गुणांमध्ये (सस्पेंशन पॉईंट्स) रूपांतर होते. दोन सस्पेंशन पॉईंट्समुळे खेळाडूवर एका कसोटी किंवा दोन एकदिवसीय/टी-२० सामन्यांची बंदी लादली जाऊ शकते. हे डिमेरिट पॉईंट्स पुढील २४ महिने खेळाडूच्या शिस्तविषयक नोंदीमध्ये कायम राहतील.

दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय

दरम्यान, या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारतीय संघाने मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या दिवशी ५ बाद ३०० धावा करणाऱ्या भारताने दुसऱ्या सत्रात ८ बाद ४७५ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल ९५ धावांवर नाबाद असून, तो आपल्या कसोटी शतकापासून अवघ्या ५ धावा दूर आहे. यशस्वी जैस्वालला मात्र या मालिकेत अद्याप मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असून, पहिल्या कसोटीतील ३२ व शून्य या धावसंख्येपाठोपाठ कोलंबो कसोटीतही तो ४५ धावांवर माघारी परतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT