IND vs SL Test Day 2 Pudhari
स्पोर्ट्स

IND vs SL Test Day 2 : पडिक्कलचे द्विशतक हुकले; जुरेलचे अर्धशतक, टीम इंडियाने ७ गडी गमावत मारली ४६० धावांपर्यंत मजल

पावसामुळे दुसर्‍या दिवसाचे तब्बल २ तास ३५ मिनिटे गेले वाया, श्रीलंकन गोलंदाजांचे पुनरागमन

पुढारी वृत्तसेवा

IND vs SL Test Day 2: देवदत्त पडिक्कलच्‍या दमदार १६७ धावा आणि ध्रुव जुरेलच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकाच्या बळावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ९ बाद ४६० धावांपर्यंत मजल मारली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या दिवशी भारताने ७ फलंदाज गमावले, तरीही तळाच्या फलंदाजांच्या मोलाच्या योगदानामुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. खेळ थांबला तेव्हा कुलदीप यादव १२ तर प्रसिद्ध कृष्णा १ रनवर नाबाद खेळत होते. खराब हवामान आणि ओल्या मैदानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ तब्बल २ तास ३५ मिनिटे उशिराने सुरू झाला.

फलंदाजांनी चुकीच्या फटक्यांमुळे गमावल्‍या विकेट्स

भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात २ बाद २८८ धावांवरून केली होती. भारताकडे पहिल्याच दिवशी मोठी आघाडी घेण्याची उत्तम संधी होती. मात्र, श्रीलंकन गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या तुलनेत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना सहज धावा करू दिल्या नाहीत. भारताने दिवसभरात १७२ धावा जोडताना ७ विकेट्स गमावल्या. यामध्ये काही बळी श्रीलंकन फिरकीपटूंच्या फिरकीचे फलित ठरले, तर काही प्रसंगी भारतीय फलंदाजांच्या चुकीच्या फटक्यांमुळे विकेट्स गेल्या.

पडिक्कलचे द्विशतक हुकले; १६७ धावांवर बाद

पडिक्कलने १३१ धावांवरून आपल्या डावाला पुढे सुरुवात केली आणि उत्कृष्ट फलंदाजी करत १५० धावांचा टप्पा पार केला. त्याने २१५ चेंडूंत असिता फर्नांडोच्या चेंडूवर सुंदर 'पुल शॉट' मारून चौकारासह ही कामगिरी केली.पडिक्कलने संयम आणि आक्रमकता यांचा उत्तम मेळ साधला. मात्र, चहापानापूर्वी तो १६७ धावांवर बाद झाला. प्रभात जयसूर्याच्या फिरकीवर चकमा खाल्ल्यानंतर यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने त्याला सहज स्टंपिंग केले.पडिक्कलच्या या खेळीमुळे तिसऱ्या क्रमांकासाठी भारताकडे एक मजबूत पर्याय उपलब्ध झाला आहे. नियमित फलंदाज साई सुदर्शन दुखापतीतून पुनरागमन करत असला, तरी पडिक्कलने या क्रमांकासाठी आपला दावा भक्कम केला आहे.

पंत आणि राहुल स्वस्तात तंबूत

भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच ऋषभ पंतच्या रूपाने मोठा धक्का बसला. पंत ३९ धावांवर असताना केशरा नुवांथाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सोनल दिनूषाने धावत जात त्याचा सुरेख झेल घेतला.त्यानंतर आदल्या दिवशी ७७ धावांवर स्नायू ताणले गेल्याने 'रिटायर हर्ट' झालेला केएल राहुल पुन्हा फलंदाजीला आला. मात्र, त्याला खात्यात अवघ्या ४ धावांचीच भर घालता आली. नुवांथाच्या उसळत्या चेंडूवर राहुलने शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या निशान मधुष्काकडे सोपा झेल दिला. या दोन विकेट्समुळे श्रीलंकन गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला.

जुरेलने सावरला डाव

चहापानापर्यंत भारताची ५ बाद ३६४ अशी स्थिती होती. त्यानंतर रवींद्र जडेजा नुवांथाच्या चेंडूवर पायचीत (LBW) होत ३७७ धावांवर ६ व्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला.यानंतर ध्रुव जुरेलने डावाची सूत्रे हाती घेतली. मागील काही डावांत धावा हायला झगडणाऱ्या जुरेलने या सामन्यात शानदार पुनरागमन केले.तो २९ धावांवर असताना जयसूर्याच्या चेंडूवर स्लिपमध्ये श्रीलंकन कर्णधार धनंजय डी सिल्व्हाने त्याचा सोपा झेल सोडला.या जीवदानाचा जुरेलने पुरेपूर फायदा घेतला आणि सलग ८ डावांनंतर आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने नुवांथाला मिडविकेटच्या वरून षटकार आणि लाहिरू कुमाराला चौकार ठोकला.जुरेलने मानव सुतारसोबत सातव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. मात्र, अर्धशतकानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. जयसूर्याच्या चेंडूवर डी सिल्व्हाने स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल घेत आपली पूर्वीची चूक सुधारली.

तळाच्या फलंदाजांचे मोलाचे योगदान

जुरेल बाद झाल्यानंतरही भारताच्या तळाच्या फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांना चांगलेच दमवले. मानव सुतारने २४ धावांची उपयुक्त खेळी केली, तर मोहम्मद सिराजनेही काही आक्रमक फटके मारले.भारतीय संघ व्यवस्थापनासाठी सुतारची ही खेळी विशेष सकारात्मक ठरली आहे.

श्रीलंकेच्‍या फिरकीपटूंची उत्तम कामगिरी

श्रीलंकेकडून फिरकीपटूंनी दुसऱ्या दिवशी उत्तम कामगिरी केली, तर लाहिरू कुमारा आणि असिता फर्नांडो हे वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. हे दोन्ही गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेण्‍यात तसेच धावगतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT