कोलकाता : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि टीम इंडिया कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हुंकार भरण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबर पासून खेळला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास तयार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. अशा प्रकारे, कोलकात्यामध्ये सहा वर्षांनंतर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. या सामन्यात टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली विजयासह मालिकेची सुरुवात करण्यास उत्सुक असेल.
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार गिलवर कोलकात्याच्या कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष केंद्रित असेल. या सामन्यात भारतीय कर्णधाराच्या निशाण्यावर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा एक मोठा विक्रम असेल.
शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांतील १३ डावांमध्ये ७८.८३ च्या उत्कृष्ट सरासरीने ९४६ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी गिलला केवळ ५४ धावांची गरज आहे.
जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत हा पराक्रम साधला, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनेल. सध्या हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी कर्णधार म्हणून १५ कसोटी डावांमध्ये १००० धावा करण्याचा पराक्रम केला होता.
इतकेच नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक शतक झळकावताच कर्णधार गिल किंग कोहलीचा एक मोठा विक्रम मोडेल. गिलने इंग्लंड दौऱ्यावरील अँडरसन-तेंडुलकर करंडक मालिकेत चार शतके आणि त्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली कसोटीत एक शतक झळकावले होते. म्हणजेच, कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत पाच शतके पूर्ण केली आहेत.
जर गिल कोलकात्याच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झाला, तर तो एका कॅलेंडर वर्षात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढेल.
विराट कोहली - ५ शतके (वर्ष २०१७)
विराट कोहली - ५ शतके (वर्ष २०१८)
शुभमन गिल - ५ शतके (वर्ष २०२५)
विराट कोहली - ४ शतके (वर्ष २०१६)
सचिन तेंडुलकर - ४ शतके (वर्ष १९९७)