

icc rankings virat kohli into top 5 babar azam slips shubman gill gains big
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपली नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय (ODI) क्रमवारीत मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर-१ स्थानावर कायम आहे, तर स्टार फलंदाज विराट कोहली याने थेट 'टॉप-५' मध्ये प्रवेश केला आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याची खराब वेळ संपण्याचे नाव घेत नाहीये. वनडे क्रमवारीत त्याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रोहित शर्मा ७८१ रेटिंगसह आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो टॉप-५ मध्ये पोहचला असून त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे.
श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या क्रमांकावर आहे, तर दोन स्थानांचे नुकसान सोसून बाबर आझम ७०९ रेटिंगसह सातव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर सलमान अली आघा याने १४ स्थानांची झेप घेतली असून तो १६ व्या पायरीवर पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो 'टॉप-१५' मध्ये सामील झाला आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक केएल राहुल दोन स्थानांच्या नुकसानीसह १७ व्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानच्या संघाचा सलामी फलंदाज सॅम अयुब याने १८ स्थानांची मोठी झेप घेत संयुक्तपणे ३५ वे स्थान मिळवले आहे. याच स्थानावर अफगाणिस्तानचा रहमत शाह दोन स्थानांच्या फायद्यासह पोहोचला आहे.
आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान ७१० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर इंग्लंडचा जोफ्रा आर्चर दुसऱ्या पायरीवर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज एका स्थानाच्या नुकसानीसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
भारताकडून केवळ मोहम्मद सिराज याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो १५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अक्षर पटेल दोन स्थानांच्या नुकसानीसह ३२ व्या स्थानावर घसरला आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले आहे. तो ७५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, भारताकडून केवळ कुलदीप यादव 'टॉप-१०' च्या यादीत समाविष्ट आहे.
आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू क्रमवारीत अफगाणिस्तानचा अजमातुल्लाह ओमरजई ३३४ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या सलमान अली याला ७ स्थानांचा फायदा झाला असून तो ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.
शिवाय, पाकिस्तानच्या नसीम शाह याला ३ स्थानांचा फायदा झाला असून तो कुलदीप यादव सोबत संयुक्तपणे २७ व्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने ३८ स्थानांची झेप घेत ६१ वे स्थान मिळवले आहे. तर श्रीलंकेच्या केथ फ्लेचर (१६ स्थाने) आणि असिथा फर्नांडो (१६ स्थाने) यांनीही उत्कृष्ट झेप घेत संयुक्तपणे ६३ वे स्थान पटकावले आहे.
अभिषेक शर्मा टी-२० चा नंबर-वन फलंदाज असला तरी, त्याला रेटिंगमध्ये नुकसान सोसावे लागले आहे. त्याचे पाच रेटिंग कमी झाले आहे. सध्या त्याच्या खात्यात ९२० गुण आहेत. अभिषेकने गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर समाप्त झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक १६३ धावा केल्या होत्या. या कामगिरीबद्दल त्याची 'प्लेअर ऑफ द सीरीज' म्हणून निवड करण्यात आली होती. या मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते.
भारताचा 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्ती देखील अव्वल स्थानावर कायम आहे, परंतु त्याला १९ गुणांचा तोटा झाला आहे. त्याच्या खात्यात ७८० रेटिंग जमा आहे. चक्रवर्तीने ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत तीन डावांमध्ये ५ बळी घेतले होते. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका २-१ अशी जिंकली होती.