स्पोर्ट्स

Team India : २७ धावांत ६ विकेट... भारतीय फलंदाजांची आफ्रिकेसमोर ‘सामूहिक शरणागती’

IND vs SA Guwahati Test : ९५ धावांवरून थेट १२२ धावांवर ७ गडी गमावले

रणजित गायकवाड

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. पहिल्या डावात आफ्रिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले आणि एकापाठोपाठ एक गडी माघारी धाडले. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने एकीकडे अर्धशतकी खेळी करून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला असला तरी, इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाची नौका अक्षरशः डगमगली.

२७ धावा... ६ विकेट

दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांच्या खेळीत कोणताही ताळमेळ दिसला नाही. मैदानात टिकून खेळण्याऐवजी, लवकर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची जणू स्पर्धाच त्यांच्यात लागली होती. भारताचा पहिला बळी केएल राहुल ६५ धावांवर पडला. राहुलने २२ धावा केल्या. त्यानंतर भारताने ९५ धावांवर दुसरा गडी यशस्वी जैस्वालच्या (५८) रूपात गमावला. मात्र, यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

९५ धावांवरून थेट १२२ धावांवर ७ गडी गमावले

९५ धावांवरून थेट १२२ धावांवर ७ गडी गमावण्याची लाजीरवाणी वेळ भारतावर आली. याचा स्पष्ट अर्थ असा की, टीम इंडियाने अवघ्या २७ धावांच्या आत आपले ६ महत्त्वाचे फलंदाज गमावले. संघाच्या वरिष्ठ फलंदाजांनी दाखवलेल्या अनाठायी घाईमुळे टीम इंडिया मोठ्या संकटात सापडली. या धक्कादायक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये तीव्र निराशा आणि नाराजी पसरली.

ध्रुव जुरेल शून्यावर बाद; 'नंबर ३'चा प्रश्न कायम

कर्णधार शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेला युवा फलंदाज ध्रुव जुरेल तर आपले खातेही उघडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. त्याच्यावर मोठी भिस्त होती, पण त्याने कोटांगण घातले.

सर्वात मोठा चिंतेचा विषय म्हणजे वारंवार तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणाऱ्या साई सुदर्शनची कामगिरी. त्याने पहिल्या डावात केवळ १५ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून मोठ्या खेळीची प्रतीक्षा आता सर्वांनाच स्वप्नवत राहिली आहे. तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरताना दिसला नाही.

पंत, जडेजा आणि इतरांचीही शरणागती

नेहमी आक्रमक खेळणारा ऋषभ पंत कर्णधारपदाची जबाबदारी साभाळताना निष्प्रभ ठरला. त्याच्याकडून कॅप्टन्सी इनिंगची अपेक्षा होती. पण त्याने पुन्हा एकदा बेजबाबदार फटका मारून स्वत:ची विकेट टाकली. त्याच्याकडून संघाला केवळ ७ धावांचे योगदान मिळाले. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाही फक्त ६ धावा करून तंबूत परतला. नितीश कुमार रेड्डीने १० धावा केल्या, पण तोही मोठी खेळी करू शकला नाही. या सर्व फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर सहजपणे 'शरणागती' पत्करली.

मार्को जॅनसेनचा घातक मारा!

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला, त्यात मार्को जॅनसेनने सर्वाधिक ४ बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. लंचपर्यंत वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी कसाबसा डाव सावरला. या जोडीने भारताची धावसंख्या १७४ पर्यंत पोहचवली. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. लंचनंतर सुंदर ४८ धावांवर बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या १९४ होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT