

Team India squad against South Africa ODI series KL Rahul become captain
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सध्या भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, त्यानंतर लगेचच तीन सामन्यांची रोमांचक वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधत संघ निवडला आहे.
नियमित वनडे कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. कसोटी मालिकेदरम्यान त्याला मानेच्या स्नायूंमध्ये ताण जाणवला होता, ज्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतही खेळू शकला नाही. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे (KL Rahul) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. राहुलकडे यापूर्वीही भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. त्याने १२ वनडे सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यापैकी ८ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
या मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचेही वन-डे संघात पुनरागमन झाले असून, त्यांच्या समावेशामुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढली आहे. मालिकेची सुरुवात 30 नोव्हेंबर रोजी रांची येथील सामन्याने होईल. त्यानंतर 3 डिसेंबरला रायपूर आणि 6 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे पुढील सामने खेळवले जातील.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यांची उपस्थिती युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे दीर्घकाळानंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचा अनुभव गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी युवा फलंदाज तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. नियमित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आगामी टी२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांच्यासोबतच युवा खेळाडू हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी यांनाही निवडण्यात आले आहे. फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. यष्टिरक्षक म्हणून कर्णधार केएल राहुलसह ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांनाही संधी मिळाली आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये के. एल. राहुलने आतापर्यंत 88 सामन्यांमध्ये 48.31 च्या सरासरीने आणि 88.41 च्या स्ट्राईक रेटने 3,092 धावा फटकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघात पुनरागमन होत आहे. तसेच, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या मालिकेत ‘भारत अ’ संघाकडून खेळताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडनेही मुख्य संघात स्थान मिळवले आहे. या मालिकेत त्याने 105 च्या जबरदस्त सरासरीने 3 सामन्यांत 1 शतक व एका अर्धशतकासह 210 धावा कुटल्या होत्या.
भारताचा वन-डे संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, के. एल. राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव ज्युरेल.
30 नोव्हेंबर : पहिली लढत : दु. 1.30 वा. : रांची
3 डिसेंबर : दुसरी लढत : दु. 1.30 वा. : रायपूर
6 डिसेंबर : तिसरी लढत : दु. 1.30 वा. : विशाखापट्टणम