

indian womens blind cricket team wins first t20 world cup
कोलंबो : नेपाळचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत भारतीय महिला संघाने रविवारी पहिल्यावहिल्या टी-20 अंध क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. येथील पी. सारा ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक अंतिम सामना पार पडला.
अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला निर्धारित षटकांत 5 बाद 114 धावांवर रोखले. त्यानंतर विजयासाठीचे 115 धावांचे लक्ष्य भारताने 12 षटकांत केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. या सामन्यावर भारताचे वर्चस्व इतके निर्विवाद होते की, नेपाळच्या संघाला त्यांच्या संपूर्ण डावात केवळ एकच चौकार लगावता आला.
भारताकडून धावांचा पाठलाग करताना फुला सोरेनने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक नाबाद 44 धावांची खेळी साकारली. तत्पूर्वी, शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत नेपाळने पाकिस्तानवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवणाऱ्या श्रीलंकेला साखळी फेरीतील पाच सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात (अमेरिकेविरुद्ध) विजय मिळवता आला.
सहा संघांच्या या स्पर्धेत पाकिस्तानची ‘बी-3’ श्रेणीतील (अंशतः दृष्टी असलेली) खेळाडू मेहरीन अली ही स्टार फलंदाज ठरली. तिने संपूर्ण स्पर्धेत 600 हून अधिक धावा कुटल्या. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 78 चेंडूंत केलेल्या 230 धावांच्या विक्रमी खेळीचा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 133 धावांच्या खेळीचा समावेश आहे.