विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर होणारा तिसरा आणि अंतिम सामना 'करो या मरो' असा असणार आहे. जी टीम हा सामना जिंकेल, तीच मालिका आपल्या नावावर करेल. पहिल्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने ४ विकेट्स राखून रोमांचक पुनरागमन केले. आता तिस-या आणि शेवटच्या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात कोणते बदल होतील आणि अंतिम ११ खेळाडू कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सलामीचा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात सपशेल अपयशी ठरला. तरीही, कर्णधार के. एल. राहुल आणि संघ व्यवस्थापन त्याच्यावर आणखी एकदा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. तो कर्णधार रोहित शर्मा सोबत डावाची पुन्हा सुरुवात करताना दिसण्याची शक्यता आहे. रोहितने पहिल्या सामन्यात ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर 'रन मशीन' विराट कोहली उतरणार हे निश्चित आहे, ज्याने मागील दोन वनडे सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत.
चौथ्या क्रमांकावर युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या वनडेत त्याने धमाकेदार शतक (१०५ धावा) ठोकत भारतीय संघाला ३५८ धावांच्या मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
पाचव्या क्रमांकावर कर्णधार के. एल. राहुल स्वतः खेळणार असून तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघात पुन्हा एक संधी मिळू शकते.
मागील दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. दोन सामन्यांत त्याला केवळ तीन विकेट्स घेता आल्या आहेत. त्याचप्रमाणे, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर देखील प्रभावी खेळ दाखवण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या अंतिम ११ मधील स्थानावर मोठी टांगती तलवार दिसत आहे.
सुंदरच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर प्रसिद्धच्या जागी युवा वेगवान गोलंदाज नितीश कुमार रेड्डी याचा समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाजी आक्रमणामध्ये हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची जगा पक्की आहे. दुसरीकडे फिरकीपटू म्हणून अनुभवी कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
के. एल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, आणि कुलदीप यादव.