अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेटचा रणसंग्राम आता आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे. उभय संघांमधील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना शुक्रवारी (१९ डिसेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली असून, दक्षिण आफ्रिकेसमोर मालिका बरोबरीत सोडवण्याचे मोठे आव्हान आहे.
या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे.
पहिला सामना : भारताने १०१ धावांच्या मोठ्या फरकाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.
दुसरा सामना : दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करत ५१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
तिसरा सामना : टीम इंडियाने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
चौथा सामना : खराब हवामानामुळे चौथा सामना रद्द करावा लागला.
भारतीय संघ सध्या मालिकेत आघाडीवर आहे. जर भारताने शेवटचा सामना जिंकला, तर मालिका दिमाखात आपल्या नावावर करेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. विशेष म्हणजे, भारताने हा सामना गमावला तरी ते मालिका हरणार नाहीत, मात्र विजयासह शेवट गोड करण्याकडे कर्णधार आणि संघाचा कल असेल.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यात केवळ एका दिवसाचे अंतर असल्याने दोन्ही संघ गुरुवारीच (दि. १८) अहमदाबादमध्ये दाखल होतील. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
तारीख : १९ डिसेंबर, शुक्रवार
ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वेळ : सायंकाळी ७:०० वाजता