स्पोर्ट्स

IND vs SA 2nd T20 : शुभमन गिल, सूर्यकुमारला सूर गवसणार का?, भारत-द. आफ्रिका यांच्यात दुसरी टी-20 ची चाहत्यांना उत्सुकता

IND vs SA T20 Series : 5 सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या लढतीत सहज बाजी मारली असली तरी भारताला गिल आणि कर्णधार सूर्यकुमारच्या खराब फॉर्मची चिंता कायम आहे.

रणजित गायकवाड

  • भारताला मालिकेतील आघाडी भक्कम करण्यासाठी महत्त्वाकांक्षा

  • मुलनपूर येथे पुरुष गटातील पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना

  • फलंदाजीत व्यापक सुधारणेचे आफ्रिकेचे लक्ष्य

मुलनपूर-चंदीगढ : भारत-द. आफ्रिका यांच्यात गुरुवारी (दि. 11) दुसरी टी-20 होत असून शुभमन गिल व सूर्यकुमार यादव या आघाडीच्या फलंदाजांना येथे उत्तम सूर सापडावा, अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची अपेक्षा असेल. 5 सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या लढतीत सहज बाजी मारली असली तरी भारताला शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मची चिंता कायम राहिली होती. आजची लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाईल.

आशिया कपनंतर टी-20 संघात पुनरागमन केलेल्या गिलला अद्याप एकही मोठी खेळी अद्याप साकारता आलेली नाही. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा सलामीला सातत्याने धावा करत असताना, संघ व्यवस्थापनाने गिलवर दाखवलेला विश्वास अद्याप सार्थ ठरलेला नाही. टी-20 विश्वचषक विजयानंतर भारताने अधिक आक्रमक फलंदाजी शैली स्वीकारली असून, यामुळे अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. अभिषेकप्रमाणे सुरुवातीपासून धडाकेबाज फटकेबाजी करण्याचा स्वभाव गिलचा नसल्याने त्याच्यावर थोडेफार दडपण निश्चितच असणार आहे.

सूर्यावरही दडपण

गिलप्रमाणेच सूर्यकुमार यादवचीही स्थिती फारशी वेगळी नाही. गेल्या काही महिन्यांत त्याच्या फलंदाजीत सातत्य दिसलेले नाही. काही महिन्यांत घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व त्याच्याकडे असणार असल्याने त्याच्या कामगिरीचे महत्त्व अधिक वाढले आहे. पहिल्या सामन्यात दुखापतीनंतर परतलेल्या हार्दिक पंड्याने 28 चेंडूंत 59 धावा करत भारताला महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. गोलंदाजीतही पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन त्याने गोलंदाजीतही चुणूक दाखवली. अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या दोन्ही स्ट्राईक गोलंदाजांना एकाच वेळेस अंतिम अकरात स्थान देण्याची शक्यता कमी असल्याने संघाला आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची खोली असणे आवश्यक आहे. यामुळेही त्यानुसार फेरबदल होऊ शकतात.

प्रतिस्पर्ध्यांसमोर अनेक आव्हाने

दुसरीकडे, 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 74 धावांत गडबडलेल्या दक्षिण आफ्रिका संघासमोर त्वरित सुधारणा करण्याचे आव्हान असेल. भागीदारी उभारण्यात आम्ही अपयशी ठरलो आणि तेच निर्णायक ठरले, असे कर्णधार एडन मार्करामने यापूर्वी म्हटले, ते ही येथे लक्षवेधी आहे. मुलनपूर येथे हा पुरुष गटातील पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. आज येथे युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावाने तयार केलेल्या स्टँडचेही लोकार्पण होणार आहे.

संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक).

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुतो सिपामला, एन्रिच नोर्त्झे, लुंगी एन्गिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, रिझा हेंड्रिक्स, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, ओटनील बार्टमन.

हा खेळ आकड्यांचा

3 : टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार आणि 100 बळी अशी दुहेरी कामगिरी करणारे केवळ तीनच खेळाडू आहेत. हार्दिक पंड्या या यादीत समाविष्ट होण्यासाठी फक्त एका बळीच्या अंतरावर आहे. सध्या या यादीत सिकंदर रझा, मोहम्मद नबी आणि मलेशियाच्या विरनदीप सिंग यांचा समावेश आहे.

47 : अर्शदीप सिंगने भारताकडून पॉवरप्लेमधील सर्वाधिक 47 बळी घेतले असून तो भुवनेश्वर कुमारसोबत संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर आहे.

5 : जसप्रीत बुमराह हा तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांत 100 बळी घेणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. शाकिब अल हसन, लसिथ मलिंगा, टीम साऊदी आणि शाहिन शाह आफ्रिदी हे यापूर्वी या यादीत होते.

कशी असेल खेळपट्टी?

न्यू चंदीगडच्या मैदानाभोवती उंच स्टँड नसल्यामुळे खेळपट्टीवर दवाचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो. आयपीएलमध्ये येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचा 6-5 असा विक्रम आहे. या मैदानावर 200 पेक्षा जास्त धावा यशस्वीपणे बचावल्या गेल्या आहेत, तसेच 111 धावांचे लहान लक्ष्यही रोखण्यात गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. या ठिकाणी जलदगती गोलंदाजांना विशेषतः अनुकूल परिस्थिती लाभते.

हेड टू हेड

  • एकूण सामने : 32

  • भारत विजयी : 19

  • द. आफ्रिका विजयी : 12

  • निकाल नाही : 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT