स्पोर्ट्स

IND vs PAK T20 WC : श्रीलंकेसमोर झुकला पाकिस्तान..! एका पत्रानंतर गुडघे टेकले, भारताविरुद्ध खेळण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू

T20 World Cup : पाकिस्तान 'यू-टर्न' घेण्याच्या तयारीत

रणजित गायकवाड

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता नरमाईचे संकेत दिले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केलेल्या विशेष विनंतीनंतर, पाकिस्तान आपल्या भूमिकेवरून 'यू-टर्न' घेण्याच्या तयारीत असून या संदर्भात पीसीबी लवकरच आपल्या सरकारशी चर्चा करणार आहे.

नेमके प्रकरण काय?

टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला असून १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला विश्वचषक खेळण्याची परवानगी दिली आहे, मात्र भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले. आयसीसी आणि प्रसारकांसाठी महसुलाच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा सामना असल्याने, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाची मध्यस्थी

वृत्तसंस्था 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) पीसीबीला एक अधिकृत ईमेल पाठवला आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास श्रीलंका क्रिकेटचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या निर्णयामुळे स्पर्धेच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबो आणि पल्लेकल येथे होणार असल्याने त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी थेट मोहसिन नक्वी यांच्याशी संवाद साधला आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत श्रीलंकेला पाकिस्तानच्या समर्थनाची गरज असून, हा सामना रद्द झाल्यास तिकीट विक्री आणि महसुलावर गंभीर परिणाम होईल,’ असे सिल्वा यांनी स्पष्ट केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नक्वी यांनी या विषयावर सरकारशी बोलण्याचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानची विजयी सुरुवात

एकीकडे भारताविरुद्धच्या सामन्याबाबत अनिश्चितता असताना, दुसरीकडे मैदानात पाकिस्तानने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सवर ३ गडी राखून मात केली. आता १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT