स्पोर्ट्स

IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर? कॅप्टन सूर्यकुमारचे धक्कादायक विधान

Abhishek Sharma OUT T20 World Cup 2026

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील नामिबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरला खरा, मात्र नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेल्या एका विधानाने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माच्या दुखापतीबाबत सूर्याने दिलेली माहिती टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरली असून, आगामी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यातही तो खेळणार की नाही, याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे.

नेमके काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार?

नामिबियाविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, "अभिषेक शर्मा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो कदाचित पुढील एक किंवा दोन सामन्यांना मुकू शकतो. त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे." अभिषेकच्या प्रकृतीमुळे तो केवळ नामिबियाच नव्हे, तर पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातूनही बाहेर राहण्याची शक्यता बळावली आहे.

सॅमसनने पुन्हा एकदा निराशा केली

अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला सलामीला येण्याची मोठी संधी मिळाली होती. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच डावांत केवळ ४६ धावा करू शकल्याने संजूला संघातून डच्चू मिळाला होता. नामिबियाविरुद्ध त्याने ८ चेंडूत २२ धावांची वेगवान खेळी केली, ज्यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. मात्र, चांगली सुरुवात मिळूनही तो या संधीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही, ज्यामुळे त्याच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अभिषेक शर्माला काय झाले?

भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक शर्माला पोटाचा संसर्ग (Stomach Infection) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दिल्लीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी आयोजित मेजवानीतूनही तो लवकर बाहेर पडला होता. बुधवारी त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली असून तो दिल्लीत संघासोबत मैदानात उपस्थित होता, मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी लागणारी पूर्ण तंदुरुस्ती त्याने अद्याप मिळवलेली नाही.

नामिबियाविरुद्ध भारताची Playing 11

संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT