Asia Cup IND vs PAK Controversy
आशिया चषकाच्या रणभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा संघर्ष पुन्हा एकदा राजकीय आणि भावनिक वादळात बदलला आहे. १४ सप्टेंबर रोजी ग्रुप 'ए'च्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली, पण त्या विजयाहूनही मोठा संदेश भारतीय संघाने दिला. हा संदेश होता- ‘राष्ट्राभिमान प्रथम!’.
मैदानावरच्या विजयानंतर, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. हा केवळ हस्तांदोलनाचा नकार नव्हता, तर दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिलेली ती श्रद्धांजली होती. सूर्यकुमारने सामन्यानंतर आपला विजय पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पीडितांना आणि भारतीय सैन्याला समर्पित करून भारताची भूमिका स्पष्ट केली. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि त्यांचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना मोठा झटका बसला.
क्रिकेटचा खेळ हा आता राष्ट्रवादाचा आखाडा बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाने असा कठोर पवित्रा घेतल्याने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जर भारतीय संघाने २८ सप्टेंबर रोजी होणारा आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना जिंकला, तर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार देतील. नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) देखील अध्यक्ष असल्याने त्यांनाच विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते आहे.
हा निर्णय १४ सप्टेंबरच्या ‘हस्तांदोलन वादा’चा थेट परिणाम आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याआधी झालेल्या टॉसवेळी आणि विजयानंतरही पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा सोबत हस्तांदोलन केले नाही. भारताने हा विजय पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित केल्याने पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला.
या घटनेनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी तातडीने आपली नाराजी व्यक्त केली. हस्तांदोलन न करणे ‘अत्यंत निराशाजनक’ आणि ‘खेळ भावनेविरुद्ध’ असल्याची त्यांची प्रतिक्रिया होती. यावर न थांबता त्यांनी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून हटवण्याची मागणी करत पीसीबीने पुढील सामन्यांमधून माघार घेण्याची धमकीही दिली. याच दबावाखाली, हस्तांदोलन प्रकरणात हस्तक्षेप न केल्याबद्दल पीसीबीने त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विभागाचे संचालक उस्मान वाह यांची हकालपट्टी केली. यातून पीसीबीची एकूणच हतबलता आणि गोंधळ स्पष्ट दिसतो.