ind vs pak 34 Years of icc tournament rivalry know more 22 matches stats
मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये १५ फेब्रुवारी रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी क्रिकेट जगतात या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सुमारे ३४ वर्षांपासूनच्या 'राईव्हलरी'चा इतिहास अत्यंत रंजक आहे आणि तो जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
यंदाचा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानने १५ फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली असली, तरी भारतीय संघ मात्र आपली जबाबदारी चोख पार पाडणार आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होणार असून, जर सामना झाला नाही, तर संघ दुसऱ्याच दिवशी मायदेशी परतणार आहे.
आयसीसीने १९७५ मध्ये पहिल्या विश्वचषकाचे आयोजन केले होते, मात्र सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने आले नव्हते. पण १९९२ च्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आयोजित विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले. तेव्हापासून भारत-पाकिस्तान सामना म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षाही मोठे आकर्षण ठरू लागला. यंदा मात्र या आकर्षणाला पाकिस्तानच्या भूमिकेमुळे ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत.
१९९२ पासून आतापर्यंत आयसीसीने एकूण २७ प्रमुख स्पर्धांचे आयोजन केले आहे. या ३४ वर्षांच्या कालावधीत ९ वनडे विश्वचषक, ९ चॅम्पियन्स ट्रॉफी, ९ टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकूण २२ वेळा आमनेसामने आले. यातील १८ सामने भारताने जिंकले असून, पाकिस्तानला केवळ ४ वेळाच विजय मिळवता आला आहे.
एकूण सामने : २२
भारत विजयी : १८
पाकिस्तान विजयी : ४
१९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तान विश्वविजेता बनला होता, मात्र त्या स्पर्धेतही त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला आजवर एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही.
पाकिस्तानने भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये ज्या चार सामन्यांत हरवले आहे, त्यापैकी त्यांचे तीन विजय हे 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधील आहेत.
२००४ : पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
२००९ : पाकिस्तान ५४ धावांनी विजयी
२०१७ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा १८० धावांनी विजय
२०२१ (टी-२० विश्वचषक) : पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. हा विश्वचषकातील (वनडे आणि टी-२० मिळून) पाकिस्तानचा भारतावरील एकमेव विजय आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकातच पाहायला मिळतात. आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांतील अखेरची लढत २३ फेब्रुवारी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत झाली होती, ज्यात भारताने पाकिस्तानला ६ विकेट्स आणि ४५ चेंडू राखून पराभूत केले होते. तर सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने रंगले आणि तिन्ही सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली. अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद पटकावले.
आता जर यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत–पाकिस्तान सामना झाला नाही, तर पुढील सामना नेमका कधी होणार, याबाबत सध्या काहीही ठामपणे सांगता येत नाही. सर्वांचे लक्ष आता १५ फेब्रुवारीकडे लागले आहे.