ind vs eng test series india a squad players reach england
भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 20 जून रोजी खेळला जाईल. भारतीय वरिष्ठ संघापूर्वी, भारत-अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळेल. यानंतर, भारत-अ संघ 13 ते 16 जून दरम्यान भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध इन्ट्रा स्कॉड सामना खेळणार आहे. हा एक सिक्रेट सामना असणार आहे.
भारत-अ संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
आता भारत-अ संघातील 7 खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. तुषार देशपांडे याने इंग्लंडमधील कॅन्टरबरी येथून इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सातही खेळाडू एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. यामध्ये आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि तुषार देशपांडे यांचा समावेश आहे. फोटोमध्ये राजस्थानच्या खेळाडूंशिवाय तनुष कोटियन, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड दिसत आहेत.
यशस्वी जैस्वालने आयपीएल 2025 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. त्याच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. चालू हंगामात त्याने 14 सामन्यांमध्ये एकूण 559 धावा फटकावल्या. यामध्ये त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके झळकली. त्याचा भारतीय संघाच्या मुख्य संघातही समावेश असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत अ संघ 30 मे पासून कॅन्टरबरी येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध चार दिवसांचा सामना खेळणार आहे. चार दिवसांचा सामना प्रथम श्रेणीचा सामना मानला जातो. यानंतर, दुसरा सामना 6 जूनपासून नॉर्थम्प्टन येथे खेळला जाईल. तर शेवटी भारत-अ संघ भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध एक इन्ट्रा स्कॉड सामना खेळेल.