India vs England Test series Records 
स्पोर्ट्स

IND vs ENG Test Series : इंग्लंडच्या मैदानांवर फक्त 3 भारतीयांनाच करता आला ‘हा’ महान पराक्रम! यावेळी कोण इतिहास रचणार?

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला कठीण आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

रणजित गायकवाड

ind vs eng test series 2025 indian players to score more than 500 runs in a test series in england

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने 7 मे तर विराटने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उभय संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आता इंग्लंड दौ-यासाठी रोहित आणि विराटच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणे रंजक ठरेल.

विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला अनुभवाची खूप कमतरता भासणार आहे. अशा परिस्थितीत फलंदाजीची जबाबदारी यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर असेल. इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडियाच्या अनेक महान खेळाडूंनी फलंदाजीने अद्भुत कामगिरी केली आहे. असे असले तरी, इंग्लिश खेळपट्टीवरील कसोटी मालिकेत 500 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा मोठा पराक्रम फक्त तीन भारतीय फलंदाजांनी केला आहे. यामध्ये राहुल द्रविड, विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे.

इंग्लंडच्या वेगवान आणि आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणारे सुनील गावस्कर हे पहिले भारतीय फलंदाज आहेत. त्यांनी 1979 मध्ये हा कारनामा केला. तेव्हा गावस्कर यांनी सातत्यपूर्ण खेळीच्या जोरावर 4 सामन्यांच्या मालिकेत 542 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत 500 हून अधिक धावा काढण्यास भारतीय फलंदाजांना तब्बल 00 वर्षे लागली. 2002 मध्ये राहुल द्रविडने 4 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 602 धावा चोपल्या. तर 16 वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये विराट कोहलीने 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावात 2 शतकांसह 593 धावा फटकावल्या.

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या सर्वाधिक धावा

  • राहुल द्रविड : 602 (2002)

  • विराट कोहली : 593 (2018)

  • सुनील गावस्कर : 542 (1979)

विराट कोहलीनंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला इंग्लंडमधील कसोटी मालिकेत 500 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. आता इंग्लिश भूमीवर कोणता भारतीय फलंदाज 500 धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी होतो याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

जर टीम इंडियाला इंग्लंडमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर टॉप ऑर्डरला मोठ्या भागीदारी रचून धावा जमवाव्या लागतील. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत यांच्याकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दोन्ही फलंदाजांना इतिहास रचण्याची संधी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT