IND vs ENG 4th test Team India waiting victory in Manchester for 89 years
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंदुलकर कसोटी मालिकेतील 3 सामने पूर्ण झाले आहेत. लॉर्ड्स येथील कसोटीत अवघ्या 22 धावांनी मिळवलेल्या रोमहर्षक विजयानंतर यजमान इंग्लिश संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघासाठी येथून मालिकेत पुनरागमन करणे अनिवार्य झाले आहे, परंतु पुढील वाटचाल संघासाठी सोपी असणार नाही. पुढील कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे टीम इंडियाला आजवर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. गेल्या 89 वर्षांपासून भारतीय संघ येथे कसोटी विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
लॉर्ड्सवर टीम इंडियाला मालिकेत टिकून राहण्याची आणि आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. गेल्या 10-12 वर्षांत भारताने या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या सामन्यातील पराभवाने सर्व समीकरणे बदलली आहेत. आता संघासमोर मँचेस्टर आणि केनिंग्टन ओव्हलची आव्हाने आहेत. मँचेस्टरमध्ये तर भारताने कधीही विजय मिळवलेला नाही. 1936 पासून या मैदानावर भारताने 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. बर्मिंगहॅमप्रमाणेच मँचेस्टरमधील पराभवाची मालिका खंडित करण्यात कर्णधार शुभमन गिल यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
त्याचबरोबर, ओव्हल मैदानाची खेळपट्टी आणि येथील परिस्थिती सर्वांनीच पाहिली आहे, जिथे WTC 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 200 पेक्षा जास्त धावांनी पराभव केला होता. पुढील सामन्यात वेगवान गोलंदाज मार्क वुडचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, मॅथ्यू पॉट्स, जोफ्रा आर्चर, वुड आणि गस ऍटकिन्सन यांना संधी मिळाल्यास ते भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे, या दोन्ही मैदानांवरील भारताची निराशाजनक कामगिरी, इंग्लंडमधील सध्याची परिस्थिती आणि यजमान संघाचा फॉर्म पाहता, भारतासाठी मालिका जिंकणे अत्यंत कठीण दिसत आहे.
एवढेच नव्हे, तर भारातीय संघाची अंतिम 11 खेळाडूंची निवड देखील प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. दुखापती, खेळाडूंच्या कार्यभाराचे व्यवस्थापन आणि सुमार कामगिरी या तिन्ही आघाड्यांवर संघ व्यवस्थापनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, संघ आणि प्रशिक्षकांसमोर तीन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
मालिकेपूर्वीच जाहीर केल्यानुसार, बुमराह दुसरा आणि चौथा कसोटी सामना खेळणार नव्हता. त्यानुसार, संघ 1-0 ने पिछाडीवर असतानाही त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती. आता भारत मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असताना चौथ्या कसोटीपूर्वी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कार्यभाराच्या व्यवस्थापनामुळे बुमराह या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी कोणाला संधी द्यावी, हा मोठा प्रश्न आहे. प्रसिद्ध कृष्णा मागील दोन सामन्यांत अत्यंत महागडा ठरला, तर आकाशदीप तिसऱ्या कसोटीत पूर्णपणे तंदुरुस्त आणि लयमध्ये दिसला नाही. अशा परिस्थितीत, कसोटी क्रिकेटचा अनुभव नसलेला आणि इंग्लंडमधील परिस्थितीत कधीही न खेळलेला अर्शदीप सिंग किती प्रभावी ठरेल, हे सांगणे कठीण आहे.
तिसऱ्या क्रमांकाची फलंदाजी आणि करुण नायरची कामगिरी पहिल्या कसोटीपासूनच चिंतेचा विषय बनली आहे. पहिल्या कसोटीत साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये त्याला संघाबाहेर बसवून करुण नायरला मधल्या फळीतून तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, मात्र तोदेखील पूर्णपणे अपयशी ठरला. सलग 6 डावांमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळले जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत साई सुदर्शन किती प्रभावी ठरेल याचीही खात्री नाही. संघात अभिमन्यू ईश्वरनच्या रूपात एक प्रतिभावान खेळाडू उपलब्ध आहे, परंतु त्याचा खेळ अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर पारखला गेलेला नाही.
लॉर्ड्स कसोटीतील ऋषभ पंतच्या दुखापतीने भारताच्या अडचणींमध्ये आणखी भर घातली. तो यष्टीरक्षणासाठी उपलब्ध नसल्याने ध्रुव जुरेलला बदली यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरावे लागले. पण त्याची कामगिरी प्रभावी दिसली नाही. इंग्लंडच्या दुस-या डावात विकेटच्या मागे 25 अवांतर (बाईज) धावा खर्च झाल्या. शिवाय, फलंदाजी करतानाही पंतला त्रास होत होता. दोन्ही डावांमध्ये तो अस्वस्थ दिसला. त्याने अनेकदा डावा हात सोडून एकहाती फटके खेळले. दुसऱ्या डावात ज्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला, त्यावरही त्याने एकहाती चेंडू बॅटने तटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याचे पूर्णपणे तंदुरुस्त होणे अत्यंत आवश्यक आहे. जर तो तंदुरुस्त नसेल, तर कोणताही विचार न करता ध्रुव जुरेलला संधी देणे हा एकमेव पर्याय संघासमोर असेल.