स्पोर्ट्स

Ajinkya Rahane vs Gambhir-Gill : ‘अष्टपैलू’ रणनितीवर रहाणेचा प्रहार! गंभीर-गिलला सुनावले, म्हणाला; ‘..आधी 20 बळी घ्या’

'आगामी सामन्यांमध्ये भारताने एका अतिरिक्त गोलंदाजाचा संघात समावेश करण्याचा विचार करायला हवा. '

रणजित गायकवाड

ind vs eng 4th test ajinkya rahane slams team india s all rounder strategy

इंग्लंडविरुद्धची लॉर्ड्स कसोटी अगदी थोडक्यात गमावल्यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार गिल यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात एका अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करणे आवशयक आहे, असे मत त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून व्यक्त केले आहे.

हेडिंग्ले येथील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर, भारताने विशेषज्ञ गोलंदाजांऐवजी संघात अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. यामुळे संघाला गोलंदाजीचे अधिक पर्याय तर मिळालेच, शिवाय फलंदाजीची खोलीही वाढली. मात्र, हा बदलही त्यांना लॉर्ड्सवरील पराभवापासून वाचवू शकला नाही. तिथे नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असूनही भारतीय संघ 193 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. तरीही रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी या त्रिकुटाने उपयुक्त योगदान दिले, त्यामुळे 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीसाठी त्यांना संघातून वगळणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी कठीण झाले आहे.

रहाणे म्हणाला, ‘आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी करणे थोडे कठीण होते. धावा करणे सोपे नसते. इंग्लंडने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. पण मला वाटतं की पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी भारताने गमावली. मला असेही वाटते की, आगामी सामन्यांमध्ये भारताने एका अतिरिक्त गोलंदाजाचा संघात समावेश करण्याचा विचार करायला हवा. कारण कसोटी सामना किंवा मालिका जिंकायची असेल, तर तुम्हाला 20 बळी घ्यावेच लागतील. त्यामुळे जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि सिराज यांच्यासोबत मँचेस्टरमध्ये इंग्लंडला हरवण्यासाठी भारताला आणखी एका पर्यायाची गरज असेल.’

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा नेहमीच अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास राहिला आहे. ही रणनीती टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी ठरली आहे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही.

तो अतिरिक्त गोलंदाज कोण असेल?

यासाठी कुलदीप यादव हा एक स्पष्ट पर्याय आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, त्याला कोणाच्या जागी खेळवायचे? सुंदरने लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात चार बळी घेतले होते आणि नितीश रेड्डीनेही सामन्यात तीन बळी घेऊन आपले काम चोख बजावले.

भारतीय संघ एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजालाही खेळवू शकतो, परंतु तो निर्णय सामन्याच्या आदल्या दिवशी खेळपट्टीची परिस्थिती पाहून आणि फलंदाजी कमकुवत करण्याचा धोका संघ व्यवस्थापन पत्करणार का? यावर अवलंबून असेल.

लॉर्ड्समधील पराभवावर रहाणेचे विश्लेषण

रहाणेने बेन स्टोक्सच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले, ज्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. त्याने सांगितले की, स्टोक्सने ज्याप्रकारे चपळाईने चेंडूवर झडप घातली, एका हाताने तो उचलला आणि नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकून ऋषभ पंतला धावबाद केले, तो क्षण इंग्लंडच्या बाजूने सामना फिरवणारा ठरला.

रहाणे पुढे म्हणाला, ‘भारत 40 धावांवर 1 बाद अशा चांगल्या स्थितीत होता, पण करुण नायरच्या पायचीत झाल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले.’ रहाणेच्या मते, तोच सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, ज्यानंतर इंग्लंडने आपला खेळ कमालीचा उंचावला. त्यांची गोलंदाजी अधिक प्रभावी झाली, क्षेत्ररक्षणातील तीव्रता वाढली आणि त्यांनी जबरदस्त जिद्द दाखवली.

भारताने गमावलेल्या संधीवर भाष्य करताना रहाणे म्हणाला की, हा सामना भारताने जिंकायला हवा होता. त्याने पहिल्या डावातील केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या भागीदारीचे विशेष कौतुक करत म्हटले की, त्या दोघांनी खूप सुंदर फलंदाजी केली. तथापि, भारताला अखेरीस 75 ते 100 धावा कमी पडल्या आणि त्यामुळेच सामना गमवावा लागला, असेही त्याने मान्य केले.

रहाणे सध्या इंग्लंडमध्ये असून नुकत्याच झालेल्या लॉर्ड्स कसोटीदरम्यान तो मैदानावर उपस्थितही होता. विशेष म्हणजे, कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा त्याने अजूनही सोडलेली नाही. त्याला परदेशात कसोटी मालिका कशी जिंकायची याचा दांडगा अनुभव आहे. 2020-21 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेला होता, त्यावेळी तत्कालीन कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे दौ-यातून बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने टीम इंडियाचे नेतृत्व केले. संघाला पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर सावरले आणि उर्वरीत दोन सामने जिंकून ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. त्या मालिकेत आताचा कर्णधार शुभमन गिलनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT