स्पोर्ट्स

अश्विन अन्नाची कमाल! ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ बनून केली विक्रमी धमाल

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record Player of the Series Award : कानपूर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर शानदार विजय नोंदवला. पावसामुळे सामन्याचे तीन दिवस वाया गेले असतानाही भारतीय संघाने शेवटच्या दोन दिवसांत सुपरफास्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि सामना 7 गडी राखून जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात घातली. या मालिकेत भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बॉल आणि बॅटने उत्कृष्ट योगदान दिले. त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारासह त्याने श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली.

अश्विनची अष्टपैलू कामगिरी

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 38 वर्षीय फिरकीपटूने दोन कसोटीत एकूण 114 धावा केल्या आणि चार डावात एकूण 11 फलंदाज बाद केले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्याला विकेट मिळाली नाही, पण दुसऱ्या डावात त्याने 88 धावामध्ये बांगलादेशच्या सहा फलंदाजांना बाद केले. त्यानंतर कानपूरच्या ग्रीन पार्क येथे दुसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. बॅट तसेच चेंडूने केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे अश्विन प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारचा मानकरी ठरला.

अश्विनचा कसोटीतील 11वा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार

अश्विनचा हा कसोटी करिअरमधील 11वा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार ठरला आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली आहे. श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूने त्याच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत एकूण 61 कसोटी मालिका खेळल्या, ज्यातील 11 मालिकांमध्ये त्याने प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला. तर 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने आतापर्यंत केवळ 42 मालिका खेळून हा टप्पा गाठला आहे. अशाप्रकारे 50 पेक्षा कमी मालिकांमध्ये 11 प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. अश्विन सक्रिय खेळाडू आहे, तो भारतासाठी सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे भविष्यात त्याला मुरलीधरनला मागे सोडण्याची संधी असेल.

सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू

मुथय्या मुरलीधरन : 11

रविचंद्रन अश्विन : 11

जॅक कॅलिस : 8

शेन वॉर्न : 8

इम्रान खान : 8

रिचर्ड हॅडली : 8

बुमराहच्या 11 विकेट

अश्विनशिवाय भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 11 बळी घेतले. मात्र, फलंदाजीतील योगदानामुळे अश्विनला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात आले.

कानपूर कसोटी काय झाले?

कानपूर कसोटी सामन्याचा दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे रद्द झाला. मात्र, भारताने हा सामना अवघ्या दोन दिवसांत जिंकला. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांत आटोपला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने अवघ्या 34 षटकांत 9 बाद 285 धावांवर डाव घोषित केला आणि 51 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 146 धावांतच गारद झाला. यासह भारताला विजयासाठी फक्त 95 धावांचे लक्ष्य मिळाले, जे रोहितसेनेने सहजत गाठले. टीम इंडियाने 17 षटकांत तीन गडी गमावून 98 धावा केल्या आणि पाहुण्या संघाचा सफाया केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT