पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India WTC Points Table : कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. यापूर्वी टीम इंडियाने चेन्नई कसोटी 280 जिंकली होती. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचबरोबर बांगलादेशची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
कानपूर कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 74.24 झाली आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ पाचव्या स्थानावर होता आणि आता तो सातव्या स्थानावर घसरला आहे. डब्ल्यूटीसी 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे. नुकतीच या संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यांची विजयाची टक्केवारी 42.19 आहे. (Team India WTC Points Table)
कानपूर कसोटी सामन्यापूर्वी सहाव्या स्थानावर असणारा द. आफ्रिकेचा संघ आता पाचव्या स्थानावर आला आहे. या संघाच्या विजयाची टक्केवारी 38.89 आहे. पहिल्या WTC चे विजेतेपद पटकावणारा न्यूझीलंडचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 37.50 आहे. कानपूर कसोटी गमावल्यानंतर बांगलादेशची विजयाची टक्केवारी 34.38 झाली असून ते सातव्या स्थानावर घसरले आहेत. पाकिस्तान (19.05%) 8व्या आणि वेस्ट इंडिज (18.52%) नवव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानात मालिका विजय मिळवल्यानंतर बांगलादेशचा संघ चांगलाच हवेत गेला होता. त्याया संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने भारतीय संघाला भारतात पराभूत करण्याची मुक्ताफळे उधळली होती. पण चेन्नई आणि त्यानंतर कानपूर कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशला रडकुंडीला आणून चांगलीच जिरवली.
कानपूर कसोटीमध्ये पावसाचा मोठा व्यत्यय आला. त्यामुळे अडीच दिवसांहून अधिकचा खेळ वाया गेला. पण रोहित शर्माच्या आक्रमक डावपेचांमुळे ही कसोटी टी-20 सामन्याप्रमाणे रोमांचक झाली. भारतीय संघाने बांगलादेशला दुसऱ्या डावात 146 धावांत गुंडाळले. ज्यामुळे यजमान भारतीय संघाला 95 धावांचे माफक लक्ष्य मिळाले, जे रोहितसेनेने 3 विकेट गमावून सहज गाठले. यशस्वी जैस्वालने 51 धावांची खेळी साकारली, तर विराट कोहलीने नाबाद 29 धावा केल्या आणि पंत 4 नाबाद धावा करून परतला.
कानपूर कसोटी जिंकून भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. टीम इंडियाने 11 सामन्यांत 8वा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताची या पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. 3 सामन्यांची ही मालिका देखील भारतीय भूमीत खेळवली जाणार आहे. त्यानंतर रोहितसेना ऑस्ट्रेलिया दौ-यावर बॉर्डर-गावस्कर मालिका खेळायला जाईल. 5 सामन्यांच्या या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.