Imran Khan health condition in jail  Pudhari news
स्पोर्ट्स

Imran Khan : 'मी कदाचित जिवंत परत येणार नाही': पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे न्यायाधीशांना खुले पत्र

तुरुंगात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असल्याचा केला दावा

पुढारी वृत्तसेवा

Imran Khan health condition in jail : पाकिस्तानातील कारागृहात ढासळत्या प्रकृतीमुळे आपला जीव जाण्याची भीती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला आणि आपली पत्नी बुशरा बीबी यांना योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. उजव्या डोळ्याची ८५ टक्के दृष्टी गमावल्याचे सांगत, आपल्याला मेंदूमध्ये रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. तसेच, डोळ्याच्या आधी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बुशरा बीबी यांची दृष्टीही खालावत चालल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मी कदाचित जिवंत परत येणार नाही...

‘डॉन’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सोमवारी पाकिस्तानातील फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट, सर्वोच्च न्यायालय आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या खुल्या पत्रात खान यांनी म्हटले आहे की, “वयाच्या ७४ व्या वर्षी ही दयनीय अवस्था मला अशा टप्प्यावर घेऊन जात आहे, जिथून मी कदाचित जिवंत परत येणार नाही.”

इम्रान खान यांचे वकील काय म्‍हणाले?

“मी हे पत्र पूर्ण प्रामाणिकपणे आणि केवळ त्यांच्याच (इम्रान खान) निर्देशांनुसार पुढे पोहोचवले आहे. पुढील शब्द त्यांचेच आहेत,” असे वकिल सफदर यांनी स्पष्ट केले.इम्रान खान ५ ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत, तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १७ जानेवारी २०२५ रोजी एका वेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दिवसातून तब्बल २२ तास एकान्तवासात

पत्रात इम्रान खान यांनी आपण “एकान्त कोठडीत” (सोलेटरी सेल) असल्याचे नमूद करत, “माझा आवाज या भिंतीबाहेर जाण्याचा हाच एकमेव मार्ग उरला आहे,” असे म्हटले आहे.त्यांना दिवसातून तब्बल २२ तास एकान्तवासात ठेवले जात असून, कुटुंबीय, वकील, पुस्तके, दूरदर्शन (टीव्ही) किंवा मुलगे कासिम आणि सुलेमान यांच्याशी फोनवर बोलण्यापासूनही वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.“मला पूर्णपणे वेगळे, बाह्य जगाशी संपर्क तोडून आणि अमानुष एकान्तवासात दिवसातून चोवीस तासांपैकी तब्बल बावीस तास डांबून ठेवले गेले होते,” असे त्यांनी लिहिले आहे.

उजव्या डोळ्याची ८५ टक्के दृष्टी गेली

वकील सफदर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० फेब्रुवारी रोजी भेटण्याची परवानगी मिळाल्यानंतरच आपल्या उजव्या डोळ्याची ८५ टक्के दृष्टी गेल्याची बाब उघडकीस आल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.तसेच, १० नोव्हेंबर रोजी त्यांचे रक्तदाब (ब्लड प्रेशर) १९२ ते १९३ दरम्यान पोहोचले होते, असे नमूद करत डॉक्टरांनी आपल्याला ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बळावल्याचा इशारा दिल्याचा दावा त्यांनी केला. याआधीच आपल्या हृदयाचे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशांनंतरही ‘शिफा हॉस्पिटल’मध्ये नेले नाही

डोळ्याच्या उपचारासाठी इम्रान खान यांना अदियाला तुरुंगातून इस्लामाबादच्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) मध्ये नेण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीविषयी ही नवीन माहिती समोर आली आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, १०-११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री डॉक्टरांनी दृष्टीशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्या उजव्या डोळ्यात ‘इंट्राव्हिट्रियल अँटी-VEGF’ इंजेक्शन दिले. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन पुन्हा तुरुंगामध्ये आणण्यात आले.तत्पूर्वी, १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने खान यांना दोन दिवसांच्या आत इस्लामाबादच्या शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे, त्यांची तपासणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्याचे आणि त्यांना कुटुंबीयांना भेटू देण्याचे निर्देश दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT