India Pakistan match Handshake Row : भारत-पाकिस्तान (Pakistan vs India) हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी (दि. १४) आशिया चषकानिमित्त आमने-सामने आले. मात्र या सामन्याला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचीही किनार होती. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासह इतर खेळाडूंनी आपला करारी बाणा दाखवत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि इतर खेळाडूंशी हस्तांदोलन (शेकहँड) टाळले. आता या मुद्यावरुन पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) मागणी फेटाळून लावली आहे. ICC ने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आपला निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवला आहे.
रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) काही अधिकाऱ्यांना ( यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या संचालकांचाही समावेश होता) दोन्ही संघांचे कर्णधार सामन्यानंतर हस्तांदोलन करणार नाहीत याची आधीच कल्पना होती. तरीही, पीसीबी आणि मोहसिन नक्वी यांनी या प्रकरणावरून वाद निर्माण केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेकडे भारतीय खेळाडू आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली होती. पीसीबीने तक्रार पत्रात म्हटले होते की, पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याला सूर्यकुमार यादवसोबत हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती. भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघासोबत हस्तांदोलन करण्यास नकार देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही पीसीबीने केला होता.
त्यानंतर पीसीबीने आयसीसीलाही पत्र लिहिले होते. या पत्रात पीसीबीने स्पष्टपणे म्हटले होते की, अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधून हटवले नाही, तर आपला संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. पाकिस्तानचा पुढील सामना उद्या यूएईविरुद्ध आहे. मात्र, पीसीबीची ही 'धमकी' आयसीसीसमोर चालली नाही. रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने पायक्रॉफ्ट यांच्या भूमिकेत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही आणि ACC ला या प्रकरणाची आधीच कल्पना होती. त्यामुळे, जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीने पीसीबीची मागणी फेटाळली.
भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्यामुळे आदळआपट करणार्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्याच एका अधिकाऱ्यावर कारवाई केली. भारताकडून ७ गडी राखून पराभव झाल्यानंतर, पीसीबीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक उस्मान वहला यांना निलंबित केले. पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तांनुसार, मोहसिन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील बोर्डाने उस्मान वहला यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई केली, कारण ते 'हँडशेक' वादावर वेळेवर पाऊल उचलू शकले नाहीत, ज्यामुळे हा महत्त्वाचा सामना वादाच्या भोवऱ्यात अडकला.
सामन्यानंतर जे घडले, त्याने सर्वांचे लक्ष वेधले. सहसा, सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात, पण यावेळी असे झाले नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव विजयी षटकार मारल्यानंतर शिवम दुबेसोबत थेट पॅव्हेलियनकडे गेला. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकमेकांना मिठी मारून विजयाचा जल्लोष साजरा केला, पण पाकिस्तान संघासोबत कोणतीही औपचारिकता केली नाही. महत्त्वाचे म्हणजे, नाणेफेकीच्या वेळीही सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाशी हस्तांदोलन केले नव्हते. सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंच्या कृतीला 'सायलेंट बॉयकॉट' (प्रतीकात्मक बहिष्कार) असे म्हटलं गेले. .
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय संघाचा एक सदस्य सर्व खेळाडू आणि कर्मचारी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करताना दिसत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर उभे राहून वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, भारतीय खेळाडू आपापसात जल्लोष करत होते. पाकिस्तानी संघ हस्तांदोलन करण्यासाठी रांगेत पुढे सरसावताच भारतीय ड्रेसिंग रूमचा दरवाजा आतून बंद करण्यात आला.