मुंबई : भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
गिल (784 मानांकन गुण) आणि रोहित (756) यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे, तर पाकिस्तानचा बाबर आझम (739) तिसर्या स्थानी आहे. कोहलीचे 736 गुण आहेत.
भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांत वन-डे सामने खेळलेले नसले, तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत कुलदीप यादव (650) आणि रवींद्र जडेजा (616) अनुक्रमे तिसर्या व नवव्या स्थानी कायम आहेत. रोहित आणि कोहली यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी दोघेही वन-डे क्रिकेट प्रकारात सक्रिय आहेत. रोहित आणि कोहली अखेरचे वन-डे सामने फेब्रुवारी 2025 मध्ये यूएई येथे झालेल्या ‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळले होते. त्या मोहिमेत त्यांनी भारताच्या विजेतेपद मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
मॅके येथे झालेल्या 50 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 431 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात शतकी खेळी करणार्या ऑस्ट्रेलियन त्रिकुटाने क्रमवारीत मोठा फायदा मिळवला आहे.
ट्रॅव्हिस हेड (142 धावा) : एका स्थानाने प्रगती करत संयुक्तपणे 11 व्या स्थानी पोहोचला आहे.
मिच मार्श (100 धावा) : चार स्थानांची झेप घेत 44 व्या स्थानी विराजमान झाला आहे.
कॅमेरॉन ग्रीन (नाबाद 118 धावा) : तब्बल 40 स्थानांची मोठी झेप घेत 78 व्या स्थानी पोहोचला.
जोश इंग्लिसचीही मोठी झेप : ऑस्ट्रेलियाचा सहकारी खेळाडू जोश इंग्लिसनेही क्रमवारीत प्रगती केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या सामन्यातील 87 धावांच्या खेळीमुळे त्याने 23 स्थानांनी सुधारणा करत 64 वे स्थान गाठले आहे.
वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानासाठीची स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका संपल्यानंतर, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महीश तिक्षणा 671 मानांकन गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजच्या बरोबरीने अव्वल स्थानी पोहोचला आहे.
मालिकेच्या अंतिम सामन्यात 57 धावांत 1 बळी घेतल्याने महाराजच्या मानांकनात घट झाली. विशेष म्हणजे, तिक्षणा या आठवड्यात एकही सामना खेळला नाही, तरीही त्याचे मानांकन महाराजच्या बरोबरीचे झाले आहे. वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात मोठी प्रगती दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक सात बळी घेत त्याने सहा स्थानांनी प्रगती करून 28 वे स्थान गाठले.