icc odi rankings rohit sharma suffers major blow loses top spot
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)च्या वनडे फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा मोठे फेरबदल झाले आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून नंबर एकचा मुकुट हिरावला गेला आहे. आता न्यूझीलंडच्या एका जबरदस्त फलंदाजाने या सर्वोच्च स्थानावर पहिल्यांदाच कब्जा केला आहे.
न्यूझीलंडचा दमदार फलंदाज डेरिल मिचेल (Daryl Mitchell) हा आता आयसीसीच्या वनडे क्रमवारीत जगातील नंबर एकचा फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मिचेलने शानदार शतक ठोकले.
या खेळीच्या जोरावर मिचेलने थेट दोन स्थानांची झेप घेतली आणि थेट अव्वल स्थान गाठले. त्याने या सामन्यात धडाकेबाज ११९ धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे त्याचे रेटिंग वाढून ७८२ झाले. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मिचेलने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले आहे.
या बदलामुळे रोहित शर्माला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हिटमॅनचे रेटिंग ७८१ आहे. नंबर एकचा फलंदाज मिचेल आणि रोहित यांच्या रेटिंगमध्ये केवळ एका अंकाचा फरक आहे. त्यामुळे पुढील क्रमवारीत पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
या नवीन क्रमवारीत इतर फलंदाजांच्या स्थानांमध्येही चढ-उतार पाहायला मिळाले. इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) एका स्थानाच्या नुकसानीसह ७६४ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल आणि रन मशीन विराट कोहली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कायम आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याला एक स्थानाचा किरकोळ फायदा झाला आहे. तो ६२२ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा श्रेयस अय्यर एका स्थानाच्या फायद्यासह ७०० रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे.
बाबर आझम, इब्राहिम जादरान, शुभमन गिल आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकून डेरिल मिचेलने थेट नंबर एकचा मुकुट मिळवणे हे त्याच्यासाठी आणि न्यूझीलंड क्रिकेटसाठी मोठे यश आहे. पुढील क्रमवारी मिचेल आणि रोहित यांच्यात एक अंकाच्या फरकामुळे अतिशय चुरशीची होणार हे नक्की.