

ईडन गार्डन्सवर 124 धावांचे लक्ष्य असताना भारतीय संघ अवघ्या 93 धावांत गारद झाला आणि या नामुष्कीजनक पराभवाने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व राहुल द्रविडच्या जमान्यात भारताने मायदेशात नेहमी फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या आणि त्या जोरावर सामने जिंकले. तीच परंपरा कोहली, पुजारा व रहाणे यांनी पुढे नेली. यामुळे 2013 ते 2024 या कालावधीत भारताने फक्त चारच सामने गमावले. आता मात्र सध्याचा भारतीय संघ फिरकीविरोधात अक्षरश: लोटांगण घालताना दिसून येतोय. मागील 6 पैकी 4 पराभव एका अर्थाने फिरकी गोलंदाजीसाठी धोक्याची घंटाच ठरताना दिसते आहे.
2020-21 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला, त्यावेळी तिसर्या कसोटीत जो रूटसारख्या पार्टटाईम गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला अक्षरश: खिंडार पाडले. जॅक लीचनेही भेदक मारा साकारला. त्यानंतर 2022-23 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच्या लियॉन व कुहनेमन यांच्याविरुद्ध शरणागती पत्करली. विराट, रोहित, पुजारासारखे फलंदाज असताना संघाचा डाव 109 धावांत खुर्दा झाला. पुढे 2023-24 मध्ये इंग्लंडविरुद्ध हैदराबाद कसोटीतही भारताची हार्टली, रूट, रेहान अहमद यांच्याविरुद्ध अशीच वाताहत झाली.
भारतीय संघ समोर तगडा प्रतिस्पर्धी असतानाच फिरकीला पोषक खेळपट्टीची मागणी करतो, असे अनेकदा दिसून आले आहे. याचाच परिपाक म्हणून विंडीजविरुद्ध 400 हून अधिक, 500 हून अधिक धावसंख्येचे डोंगर भारताने रचले, तर याचवेळी दक्षिण आफ्रिकेसारख्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मात्र काही वेळा अगदी 200 धावांचा टप्पाही पार केला गेला नाही. बुमराह, कुलदीप, सिराज, जडेजा, सुंदरसारखे कोणत्याही खेळपट्टीवर सामना फिरवणारे मॅचविनर असले, तरी या ताकदीकडेच संघाने अक्षम्य दुर्लक्ष केले का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
‘बीसीसीआय’च्या थेट दिशानिर्देशानंतरही भारतीय क्रिकेटपटू स्थानिक क्रिकेटपासून दूरच राहत आले आहेत. याशिवाय, वन-डे व टी-20 या मर्यादित क्रिकेट प्रकारात तोडफोड फलंदाजीकडे अधिक कल असल्याने त्याचाही फटका संघाला कसोटीत बसत आला आहे. या सर्वात आत्मविश्वासाचा अभाव असल्याने हा मुद्दाही कारणीभूत ठरत आल्याचे चित्र आहे.
ऑस्ट्रेलिया : कमिन्स, स्टार्क, हेझलवूड यांना पूरक ठरतील, अशा कठीण, उसळत्या गोलंदाजीला पोषक आणि जलद खेळपट्ट्या तयार केल्या जातात. या सर्व गोलंदाजांची गोलंदाजीदेखील प्रतिस्पर्धी फलंदाज हूक आणि पूल करण्याच्या प्रयत्नात फसतील, अशीच असते. यावर मात करणारे तंत्र अवगत करणे अर्थातच आव्हानात्मक ठरते.
इंग्लंड : येथील मैदानात हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या जलद गोलंदाजांसाठी पोषक ठरत आल्या आहेत. मात्र, तेथील थंड हवामान त्याहून अधिक निर्णायक भूमिका बजावते. येथे फलंदाजांना खेळपट्टी कशी आहे, यापेक्षा ते अनुभवाने किती प्रगल्भ आहेत, हे अधिक महत्त्वाचे ठरते.
भारत : एरवी भारतीय संघ मागील कित्येक वर्षे प्रतिस्पर्धी फलंदाजांची फिरकीतील दुबळी बाजू हेरत फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार करून त्यावर हुकूमतही गाजवत आला आहे. मात्र, मागील काही वर्षांत हा ट्रेंड बदलत चालला असून, प्रतिस्पर्धी फलंदाज भारतीय फिरकीचा सहज समाचार घेत असल्याचे अधोरेखित होते आहे.
भारताला मायदेशात मागील 6 पैकी 4 सामने गमवावे लागले आहेत. उर्वरित 2 विजय त्यांनी विंडीजविरुद्ध मिळवलेले आहेत. भारताने यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध 3 तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 सामना गमावलेला आहे.