icc odi bowler rankings maheesh theekshana at top
आयसीसीतर्फे नवीन वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. अलिकडेच वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. आयर्लंडने एक सामना जिंकला तर वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकला. तथापि, पावसामुळे एक सामना रद्द करण्यात आला. या मालिकेनंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारी अपडेट करण्यात आली आहे, ज्यामध्ये बरीच उलथापालथ झाली आहे.
क्रमवारीत 4 गोलंदाजांनी प्रत्येकी एका स्थानाने झेप घेतली आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एक-एक आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांचा समावेश आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आता एका स्थानाने झेप घेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजा व्यतिरिक्त न्यूझीलंडचा मॅट हेन्री देखील एका स्थानाने झेप घेत आता 7 व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा ॲडम झांपा आणि जोश हेझलवूड अनुक्रमे 9 व्या आणि 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत. दोघांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. तथापि, वेस्ट इंडिजच्या गुडाकेश मोती याची 4 स्थानांनी घसरण झाली आहे. तो टॉप-10 यादीतून बाहेर पडला आहे. टॉप-10 एकदिवसीय गोलंदाजांमध्ये भारताचे 2 गोलंदाज आहेत.
गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत टॉप-6 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. श्रीलंकेचा महेश थिक्षाना अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग 680 आहे. भारताचा कुलदीप यादव दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर द. आफ्रिकेचा केशव महाराज तिसऱ्या, नामिबियाचा बर्नार्ड स्कोल्झ चौथ्या आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर सहाव्या स्थानावर कायम आहे.
फलंदाजांच्या वनडे क्रमवारी टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचा दबदबा आहे. त्याचे अव्वल स्थानी वर्चस्व कायम आहे. गिल 784 रेटिंग गुणांसह नंबर-1 वनडे फलंदाज आहे. टॉप-10 फलंदाजांमध्ये भारताचे 3 बलाढ्य फलंदाज आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही फलंदाजांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. आता रोहित आणि विराट फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसतील. टॉप-10 मध्ये तिसरा भारतीय श्रेयस अय्यर आहे, जो 8 व्या स्थानावर आहे.