लॉर्डस् मैदानावर सुरू झालेल्या तिसर्या कसोटी सामन्याचे खास आकर्षण म्हणजे, येथील प्रसिद्ध 8 फूट 2 इंच उंचीचे स्लोप. क्रिकेट विश्वात ‘क्रिकेटची राजधानी’ मानल्या जाणार्या या ऐतिहासिक मैदानावरचा हा उतार फक्त एक भौगोलिक वैशिष्ट्य नसून तो अनेक वेळा सामन्याच्या निकालावरही प्रभाव टाकतो. विशेषतः, विदेशी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी हा स्लोप गोंधळात टाकणारा ठरत आला आहे.
आज जिथे लॉर्डस्चे मैदान आहे, तिथे पूर्वी एक बदकाचे तलाव होते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) स्थापन झाला आणि लॉर्ड विंचिल्सिया यांच्या प्रोत्साहनाने उद्योजक थॉमस लॉर्डने सेंट जॉन्स वूड येथील ही जागा भाड्याने घेतली. तिथे तीन भिन्न मैदानांची निर्मिती झाली आणि आजचे लॉर्डस्चे मैदान हे त्यातील मिडल ग्राऊंडचा एक भाग होते. वेगवेगळ्या सुधारणा सुचवूनही हा स्लोप कायम ठेवण्यात आला.
हा स्लोप गोलंदाजांसाठी धक्कादायक, पण फायदेशीर ठरत आला आहे. गोलंदाज सरळ उतारावरून धावत नाहीत, तर ते तिरकसपणे उतार ओलांडून गोलंदाजी करतात. यामुळे गोलंदाजी कोणत्या एंडवरून करायची, याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नर्सरी एंडवरून गोलंदाजी केली, तर स्लोप उजव्या बाजूकडून डावीकडे झुकतो. त्यामुळे निसर्गतः बॉल उजव्या हाताच्या फलंदाजांकडून बाहेर वळतो. त्यामुळे आऊटस्विंग करणार्या गोलंदाजांसाठी हा एंड उपयुक्त ठरतो.
इंग्लंडचा दिग्गज स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑस्ट्रेलियाचा स्पीडस्टार ग्लेन मॅकग्रा यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमी पॅव्हेलियन एंडवरूनच गोलंदाजी केली. नर्सरी एंडवरील उतारामुळे आपला रिदम चुकतो, असे अँडरसनला वाटायचे, तर ग्लेन मॅकग्राथ या उताराचा फायदा घेत असे, जेणेकरून त्याचा चेंडू अधिक खेळण्यासारखा वाटे आणि फलंदाज त्रासून जात. जसप्रीत बुमराहसुद्धा हाच एंड पसंत करतो आणि त्याचे सरळ जाणारे चेंडू या उतारामुळे अधिक घातक ठरतात.
जे गोलंदाज तिरक्या रन-अपने गोलंदाजी करतात, त्यांना नर्सरी एंड फायदेशीर वाटतो. कारण, तो उतार टाळतो. पॅव्हेलियन एंडवरून गोलंदाजी करणार्यांची रन-अप शक्यतो सरळ असते, अन्यथा उजव्या हाताच्या फलंदाजांच्या पॅडवर चेंडू आदळण्याची शक्यता वाढते.
फलंदाजांसाठी हा उतार एक वेगळाच अनुभव ठरतो. फलंदाज नर्सरी एंडकडून खेळत असताना चेंडू त्याच्याकडे येतोय असा भास होतो. जर चेंडू सरळ गेला तरीही तो गोंधळून जातो. त्यामुळे बरेच फलंदाज मधल्या स्टम्पवर उभे राहून, थोडे उजवीकडे सरकून खेळतात जेणेकरून चेंडू चुकला, तरी त्याला ‘एलबीडब्ल्यू’ होणार नाही.
यष्टिरक्षकालाही स्लोपची सवय लागेपर्यंत त्रास होतो. चेंडू अधिक झुकतो, हवेचा प्रवाह असतो आणि ड्यूक्स बॉल फलंदाजाला ओलांडून गेल्यावरही फिरतो. यामुळे यष्टिरक्षकाकडून बाय रन आणि कॅच ड्रॉप्स वाढतात.