Indian Hockey Team New Jersey  Pudhari
स्पोर्ट्स

Indian Hockey Team New Jersey : जर्सीचा रंग 'भगवा' करण्यामागे हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण; सांगितले तांत्रिक कारण

माजी कर्णधार वीरेन रस्कीना यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वादाला फुटले तोंड

पुढारी वृत्तसेवा

Indian Hockey Team New Jersey : २०२६ च्या आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलून 'भगवा' (केशरी) करण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर 'हॉकी इंडिया'ने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. निळ्या रंगाच्या कृत्रिम (सिंथेटिक) मैदानावर खेळाडू सहज दिसून यावेत (विजिबिलिटी), या तांत्रिक कारणासाठीच हा बदल करण्यात आल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.

पारंपारिक निळा रंग बदलल्यामुळे अनेकांनी व्‍यक्‍त केली होती नाराजी

नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे पुढील महिन्यात रंगणाऱ्या 'एफआयएच' विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या पारंपारिक निळ्या कपड्यांऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल, असा व्हिडिओ हॉकी इंडियाने २७ जुलै रोजी सोशल मीडियावर जारी केला होता. मात्र, पारंपारिक निळा रंग बदलल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, तर माजी कर्णधार वीरेन रस्कीना यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.

हॉकी इंडियाने दिले स्पष्टीकरण

यासंदर्भात आज (३० जुलै) हॉकी इंडियाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, निळ्या रंगाची जर्सी निळ्या रंगाच्याच मैदानाशी (टर्फ) मिळतीजुळती असल्याने खेळाडूंना मैदानावर एकमेकांना ओळखण्यात अडचण येत होती. आपल्या अधिकृत निवेदनात हॉकी इंडियाने म्हटले आहे, "हा निर्णय संघ व्यवस्थापन (सपोर्ट स्टाफ) आणि खेळाडूंच्या सल्ल्यानंतरच घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने सध्या निळ्या रंगाच्या टर्फवर खेळवले जातात. निळ्या जर्सीमुळे खेळाडू मैदानाच्या रंगात मिसळून जात होते, ज्यामुळे मैदानावरील दृश्यमानतेवर (क्लॅरिटी) परिणाम होत होता."

काय म्‍हणाले होते माजी कर्णधार वीरेन?

माजी कर्णधार वीरेन रस्कीना यांची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल झाल्यानंतर या वादाला अधिक तोंड फुटले होते. मात्र, गुरुवारी रस्कीना यांनी आपल्या पोस्टचे अनावश्यक राजकीयकरण केले जात असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. एक्सवर (ट्विटर) लिहिताना रस्कीना म्हणाले, "माझ्या पोस्टवर अनेक अनावश्यक राजकीय टिप्पण्या येत आहेत, मला यात पडायचे नाही. माझा मुद्दा फक्त स्वाभिमान, ओळख आणि परंपरेशी जोडलेला आहे. फुटबॉलमध्ये जे स्थान अर्जेंटिनाचे आहे, तेच हॉकीमध्ये भारताचे आहे. आपण कधी अर्जेंटिनाला त्यांच्या मुख्य निळ्या-पांढऱ्या जर्सीऐवजी नारिंगी आणि पांढऱ्या रंगात खेळताना पाहू का?"

दोन रंगाचा होता पर्याय, अखेर भगव्‍या रंगाची अंतिम निवड

वादाच्या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने म्‍हटलं आहे की, जर्सीसाठी पिवळा आणि भगवा अशा पर्यायी रंगांचा विचार सुरू होता. मात्र, भगवा हा आपल्या राष्ट्रध्वजाचा भाग असल्याने आणि तो शौर्य, त्याग व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असल्याने या रंगाची अंतिम निवड करण्यात आली. याआधीही जर्सीचे रंग बदलले गेल्याचे सांगत हॉकी इंडियाने स्पष्ट केले, "२०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची जर्सी पिवळ्या रंगाची होती, तर २०१८ मध्ये ती आकाशी निळ्या रंगाची करण्यात आली होती. त्यामुळे गरज आणि सोयीनुसार जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT