Women’s Hockey | सानिका माने भारतीय हॉकीचा उगवता तारा...

नूलमधील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी
Women’s Hockey |
Women’s Hockey | सानिका माने भारतीय हॉकीचा उगवता तारा...
Published on
Updated on

सागर यादव

कोल्हापूर : भारतीय हॉकी संघाचा उगवता तारा म्हणून कोल्हापूरची सानिका माने नावारूपाला आली आहे. इंग्लडंमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघातून सानिकाने विशेष कामगिरी करून हॉकीप्रेमींची मने जिंकली. अमेरिकेसारख्या दिग्गज संघांवर भारताने ६-१ अशी मात केली.

नूलच्या श्रीमती इंदिरादेवी जाधव शाळेची विद्यार्थिनी असणाऱ्या सानिकाने आपल्या हॉकी केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही विशेष कामगिरी बजावली आहे. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील चंद्रकांत व ज्योती माने यांच्या पोटी सानिकाचा जन्म झाला. आई ज्याेती माने यांनी शालेय जीवनात (१९८५ ते ९०) हॉकीपटू म्हणून नूलच्या इंदिरादेवी जाधव स्कूलमधून कारकीर्द गाजविली होती. मुलींना आंतरराष्ट्रीय हॉकीपटू घडविण्याच्या उद्देशाने सानिका व तिची थोरली बहीण कृष्णा यांना नूलच्या शाळेतच इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला. १२ वीपर्यंत शिक्षण घेत भारतीय खेल प्राधिकरणाच्या हॉकी केंद्रात त्यांनी हॉकीचे धडे घेतले.

प्रशिक्षक मनोहर मांगले, रमेश चौगुले, सचिन पोवार, अनिकेत मोरे व यांच्यासह प्राचार्य श्रीशैलाप्पा साखरे, अध्यक्ष कलाप्पाण्णा नगडदल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सानिका व कृष्णा यांनी आपली यशस्वी वाटचाल अखंड सुरू ठेवली. संस्थेच्या भक्कम पाठबळावर राज्य-राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. कृष्णाने डॉ. घाळी कॉलेजात प्रवेश घेऊन विद्यापीठ स्पर्धा गाजवत मुंबई पोलिसांत स्थान मिळविले. तर सानिकाने दोन वर्षांपूर्वी भारतीय खेल प्राधिकरणाच्या मुंबईतील प्रशिक्षण केंद्रात स्थान मिळवले. प्रशिक्षक प्रमोद शिंगाडे व रश्मी के. के. यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सन २०२८ ते २०३२ या कालावधीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी हॅट्‌ट्रिकसह ११ गोल

राज्य स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणाऱ्या इंदिरादेवी जाधव स्कूल व ज्यु. कॉलेज १७ वर्षांखालील संघाला अचानक दिल्लीतील जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी जाण्याचे आदेश राज्याच्या क्रीडा विभागाने दिले. केवळ तीन दिवसांचा कालावधी असल्याने इतक्या कमी वेळेत रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने दिल्लीला पोहोचणे शक्य नव्हते. यामुळे संस्थचे अध्यक्ष कल्लापण्णा नडगदल्ली यांनी संघाला विमानाने पाठविण्याचा धाडसी निर्णय घेतला. या संधीचे सोने करत पहिल्या सामन्यात हरियाणा संघाचा तब्बल १९-० असा धुव्वा उडवला. कर्णधार सानिका माने हिने दुहेरी हॅट्‌ट्रिकसह एकटीने ११ गोल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news