Hardik Pandya Fined
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मॅच फीच्या १० टक्के दंड आणि एक 'डेमेरिट पॉईंट' (Demerit Point) देण्यात आला आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ मधील सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मॅच फीच्या १० टक्के दंड आणि एक 'डेमेरिट पॉईंट' देण्यात आला. केकेआरच्या डावातील १० व्या षटकात ही घटना घडली. हार्दिक आपल्या रन-अपसाठी परत जात असताना त्याने रागाच्या भरात विकेटच्या बेल्स (Belts) जोरात खाली पाडल्या होत्या.
सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य किंवा कपडे, मैदानावरील साहित्य किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर करणे हा आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन ठरते. या प्रकरणी हार्दिक दोषी आढळला. हार्दिक पांड्याला मॅच फीच्या १० टक्के दंड आणि एक 'डेमेरिट पॉईंट' देण्यात आला. दरम्यान, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर ४ गडी राखून विजय मिळवला आणि प्लेऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवले.
सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, "हो, सामना बऱ्यापैकी मनोरंजक होता. नक्कीच फलंदाजी करताना आमचे १५-२० धावा कमी पडल्या. पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स गमावल्या. पण जर तिलक आणि मी खेळपट्टीवर आणखी काही वेळ टिकलो असतो आणि आणखी काही भागीदारी करून त्या १५-२० धावा केल्या असत्या, तर आमच्याकडे विजयाची चांगली संधी असती.""गोलंदाज स्वतःला हतबल समजत आहेत. पण आजच्या सामन्यात खेळपट्टीवरून गोलंदाजांनाही मदत मिळत होती. अशा खेळपट्ट्यांमुळे गोलंदाज चांगले चेंडू टाकतात आणि फलंदाजांनाही धावा करण्यासाठी चांगला क्रिकेट खेळावा लागतो. त्यामुळे मी या सामन्याचा आनंद घेतला."
"मला माहीत नाही, पण संपूर्ण हंगामात आमचे क्षेत्ररक्षण खूप सुमार राहिले आहे. आम्ही अनेक झेल सोडले, जे नक्कीच कोणालाच आवडत नाही; पण खेळाच्या या भागात तुम्ही लपून राहू शकत नाही. तुम्हाला सामने जिंकायचे असतील, तर तुम्हाला मिळणाऱ्या सर्व संधी, अगदी अर्ध्या-कच्च्या संधींचेही विकेट्समध्ये रूपांतर करावे लागेल, असेही हार्दिकने यावेळी सांगितले.