Gujarat Titans pray for RCB's defeat know about equations for Qualifier 1
आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये यापूर्वीच स्थान पक्के केले आहे, पण चारही संघांत पहिल्या दोन स्थानांमध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. आता या पराभवानंतरही गुजरात अव्वल क्रमांकावर असले, तरी त्यांचे सर्व साखळी सामने संपले आहेत.
त्यामुळे आता त्यांना पहिल्या दोन स्थानांमध्ये कायम राहायचे असेल, तर पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या अखेरच्या साखळी सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातही बेंगळुरूच्या निकालावर आता गुजरातला सर्वाधिक अवलंबून राहावे लागेल.
पंजाब किंग्जचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध सोमवारी (दि. 26) होणार आहे. तसेच बेंगळुरूचा शेवटचा सामना मंगळवारी (दि. 27) लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध खेळवला जाणार आहे.
आता जर पंजाब आणि बेंगळुरू यांनी अखेरचे साखळी सामने जिंकले, तर ते 19 गुणांवर पोहोचतील आणि पहिले दोन स्थान काबीज करतील. तसे झाले तर गुजरात तिसर्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर राहील.
पण जर मुंबईने पंजाबला पराभूत केले, तरी गुजरातला ही आशा करावी लागेल की बेंगळुरूने लखनौविरुद्ध पराभूत व्हावे, तरच गुजरात पहिल्या दोनमध्ये कायम राहील. असे झाले तर मुंबईचे 18 गुण होतील तसेच त्यांचा नेट रनरेट गुजरातपेक्षा चांगला असल्याने ते अव्वल क्रमांकावर जातील आणि गुजरात दुसर्या क्रमांकावर राहील.
मात्र जर पंजाबच्या पराभवानंतरही बेंगळुरूने विजय मिळवला, तर गुजरात तिसर्या क्रमांकावर घसरेल आणि बेंगळुरू 19 गुणांसह व मुंबई 18 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर असतील. तसेच जर पंजाबने मुंबईला पराभूत केले, तर गुजरातला आशा करावी लागेल की बेंगळुरूने पराभूत व्हावे. जेणेकरून ते दुसर्या क्रमांकावर राहतील.
म्हणजेच काहीही करून बेंगळुरू संघ अखेरचा साखळी सामना पराभूत व्हावा, अशीच इच्छा गुजरातची असेल. कारण पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी जर बेंगळुरूने लखनौला पराभूत केले, तर मात्र गुजरातला क्वालिफायर-1 सामना खेळता येणार नाही.