स्पोर्ट्स

Glenn Maxwell : आयपीएलमधील 'वादळ' विसावलं..! ग्लेन मॅक्सवेलची २०२६च्‍या हंगामातून माघार

सोशल मीडियावर निरोपाची केली भावनिक पोस्‍ट

पुढारी वृत्तसेवा

glenn maxwell pulls out ipl 2026 : ऑस्‍ट्रेलियाचा अष्‍टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आयपीएल २०२६ च्या लिलावातून अधिकृतपणे आपले नाव मागे घेतले आहे. इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्‍ट करत त्‍याने आयपीएलमधील दीर्घ प्रवासाला अनपेक्षित पूर्णविराम दिला आहे. चाहते आणि फ्रँचायझींनी वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आयपीएलने मला व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत केली

“आयपीएलमधील अनेक अविस्मरणीय हंगामांनंतर, मी यावर्षी लिलावात माझे नाव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे आणि या लीगने मला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आयपीएलने मला एक क्रिकेटपटू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत केली आहे. मी जागतिक दर्जाच्या संघातील सहकाऱ्यांसोबत खेळण्याचे, अविश्वसनीय फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करणे, चाहत्यांमध्ये अतुलनीय उत्साह आहे त्यांच्यासमोर कामगिरी करण्याचे भाग्‍य मला मिळाले. आयपीएलमधील अनेक आठवणी, आव्हाने आणि भारतीय क्रिकेट चाहत्‍यांचा उत्‍साह नेहमीच माझ्यासोबत कायम राहील.

आयपीएल २०२५ मध्‍ये खेळले केवळ सात सामने

आयपीएलच्‍या २०२५ च्‍या हंगामात ग्‍लेन मॅक्‍सवेलवर पंजाब किंग्ज संघाने ४.२० कोटी रुपयांची बोली लावली होती. या हंगामात त्‍याने सात सामने खेळले. केवळ ४८ धावा केल्या. त्‍याची धावांची सरासरी फक्‍त ८ धावा होत्‍या. त्‍याने सात सामन्‍यांमध्‍ये चार बळी घेतले होते.

आयपीएलमधून बाहेर पडणार्‍या परदेशी खेळाडूंच्‍या यादीत आणखी भर

मॅक्सवेलने आयपीएल २०२६ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे, आता स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या मोठ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत त्याची भर पडली आहे. यापूर्वी फाफ डु प्लेसिस यानेसुद्धा स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तर, कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल याने निवृत्ती जाहीर केली आहे. रसेल आता कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT