Gautam Gambhir Troll Post Pudhari
स्पोर्ट्स

Gautam Gambhir : 'देशातील सर्वात गंभीर व्यक्ती...'; टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी स्वतःलाच केले ट्रोल!

इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्‍याचा चाहत्‍यांनी व्‍यक्‍त केला संशय

पुढारी वृत्तसेवा

Gautam Gambhir Troll Post : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे गंभीर स्वभावासाठी ओळखले जातात. ते फार क्वचितच हसताना किंवा हसऱ्या चेहऱ्याने दिसतात. मात्र, नुकतेच गंभीर यांनी सोशल मीडियावर स्वतःलाच ट्रोल केले आहे. त्यांनी स्वतःवर बनवलेले काही मजेशीर मीम्स शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हसणाऱ्या फोटोंचा वापर करण्यात आला आहे. ही पोस्ट पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांना तर असा संशय आला की, गंभीर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे की काय!

गंभीर यांनी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली

झिम्बाब्वे मालिकेच्या समाप्तीनंतर गंभीर यांनी ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली. झिम्बाब्वे दौऱ्यावर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हे भारताचे हंगामी प्रशिक्षक होते, जिथे भारतीय संघाने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली. या दौऱ्यापूर्वी भारताला इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

'आम्ही भारतीय क्रिकेटमधील दुर्मिळ क्षण पाहतोय का?'

इन्स्टाग्रामवर मीम्स शेअर करताना गंभीर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "जेव्हा देशातील सर्वात गंभीर व्यक्ती हसते..." यासोबत त्यांनी हसणारा इमोजीही पोस्ट केला. या पोस्टमध्ये गंभीर यांचा हसरा फोटो आणि काही मीम्स आहेत. एका मीममध्ये तर गंभीर मदत मागणाऱ्या लोकांच्या मेसेजला अजिबात न संकोचता उत्तर देताना दिसत आहेत. दुसऱ्या मीममध्ये लिहिले होते, 'आम्ही भारतीय क्रिकेटमधील कोणताही दुर्मिळ क्षण पाहतोय का?' तर तिसऱ्या मीममध्ये 'बेबी एक काम होतं' असे लिहिले असून त्यावर गंभीर हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देतात, 'हुकूम करा मॅडमजी'.

'मला वाटलं हे फेक अकाउंट आहे...'

गंभीर यांच्या या पोस्टवर युझर्सनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युझरने कमेंट केली, "वाटतंय अकाउंट हॅक झालं आहे." दुसऱ्याने लिहिले, "चुकून वहिनींनी तर ही पोस्ट केली नाही ना?" तिसऱ्याने म्हटले, "वाटतंय कोणीतरी गौतम गंभीर यांचा पासवर्ड हॅक केला आहे." तर आणखी एका युझरने हसण्याच्या इमोजीसह लिहिले, "मी खरंच आधी हे अकाउंट चेक केलं, मला एकदा वाटलं की हे फेक अकाउंट तर नाही ना!"कमेंट्समध्ये काही लोकांनी असाही अंदाज बांधला की, ही एखाद्या स्पॉन्सर्ड कॅम्पेनची (जाहिरातीची) सुरुवात असू शकते. कारण क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी अनेकदा जाहिरातींचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशाच रंजक पोस्ट शेअर करत असतात.

भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार

मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर आता भारतीय संघाचे पूर्ण लक्ष कसोटी मालिकेवर असेल. भारताला १५ ऑगस्टपासून श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना गॅल स्टेडियमवर तर दुसरा सामना कोलंबो येथे होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. बीसीसीआयने मंगळवारी श्रीलंका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या जागी ३३ वर्षीय सारांश जैन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज साई सुदर्शन यांना फिटनेसच्या आधारावर संघात स्थान देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT